
कोकणी बाणा : सतीश पाटणकर
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे नाव आदराने घेतले जाते. महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण, साहित्य अकादमी अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. काव्य क्षेत्रात त्यांनी केलेले देदीप्यमान कार्य आपण कधीही विसरू शकणार नाही. पाडगावकरांनी त्यांच्या कवितेतून आपणास जगायला शिकवले. जीवनानुभवातील विविध अवस्थांतरे त्यांच्या कवितांनी टिपली. म्हणूनच ‘सांग सांग भोलानाथ’पासून ते ‘भातुकली’च्या खेळापर्यंत रमलेली त्यांची कविता आपल्याला ऐकायला मिळाली.
‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यांसारख्या एकापेक्षा एक लोकप्रिय गाण्यांचे गीतकार, ज्येष्ठ कवी मंगेश केशव पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी कोकणातील वेंगुर्ले या गावी झाला. त्यांच्या आईचे आजोबा दाजीसाहेब दाभोळकर हे तेथील पोलीस पाटील म्हणून प्रसिद्ध असून ते दाजी फौजदार या नावाने ओळखले जात असत. वेंगुर्ला उभादांडा येथे समुद्र किनाऱ्यावर त्यांचे घर होते. आज ते घर अस्तित्वात नाही. पाडगावकरांचे आजोबा बनुभाऊ कुलकर्णी हे लेखक होते. पाडगावकरांचे वडील केशव आत्माराम पाडगावकर हे व्यवसायाने अभियंता होते, तर मातोश्री रखमाबाई ऊर्फ इंदिरा या सुसंस्कृत गृहिणी. त्यांना वाचनाची अतोनात आवड असून त्या कविता करायच्या. आपल्या आईकडून हा वारसा त्यांनी घेतला.
पाडगावकरांचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ला उभादांडा येथील शाळा नं - ३ येथे झाले. पाडगावकरांचे वेंगुर्ल्यातील वास्तव्य १० वर्षे होते. १९३९ साली ते मुंबईत गिरगाव येथील हाजी कासीम वाडीतील इमारतीत राहावयास आले. तेथील विल्सन हायस्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. ‘विल्सन हायस्कूल’मध्ये वा. ल. कुलकर्णी यांच्यासारखे मराठीचे शिक्षक लाभले, १९४३ साली वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी पहिली कविता केली. १९४७ साली पाडगावकर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व दादर येथील कीर्ती महाविद्यालयात त्यांचे पुढील शिक्षण सुरू झाले. बी. ए. ला. ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना तर्खडकर सुवर्णपदक मिळाले व एम. ए. ला मराठी व संस्कृत या विषयातही उत्तम यश संपादन केल्यामुळे चिपळुणकर पदक मिळाले. ११ जून १९५० रोजी रेव्हं. भास्कर कृष्ण उजगरे ऊर्फ कवी मनोहर बंधू यांची कन्या यशोदा यांच्याबरोबर त्यांचा प्रेमविवाह झाला. यशोदा या त्यांच्याच वर्गात शिकत होत्या. विवाहानंतर त्यांनी काहीकाळ मिठीबाई व सोमय्या महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याच सुमारास त्यांनी कवी वसंत बापट व विंदा करंदीकर यांच्यासमवेत कविता वाचनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. त्यांचे शिक्षण मुंबई व वेंगुर्ले येथे झाले. ‘साधना’ साप्ताहिकाचे सहसंपादक म्हणूनही त्यांनी थोडे दिवस काम केले. त्यानंतर त्यांनी ‘युनायटेड स्टेट्स इन्फॉर्मेशन’मध्ये काम केले. मंगेश पाडगावकर यांचा ‘धारानृत्य’ हा पहिला कवितासंग्रह इ. स. १९५० मध्ये प्रसिद्ध झाला.
पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या विषयात पदव्युत्तर शिक्षण प्राप्त व काही काळ येथील रामनारायण रुईया महाविद्यालयात मराठीचे अध्यापनही केले. कविता या वाङ्मयप्रकारात त्यांनी लक्षणीय कार्य केले असून १९५० पासून त्यांचे सुमारे ३० काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत आणि यापैकी प्रत्येक काव्यसंग्रहाच्या सुमारे पाच-पाच आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. धारानृत्य हा त्यांचा काव्यसंग्रह १९५० साली प्रकाशित झाला. त्यानंतर प्रकाशित झालेले त्यांचे जिप्सी, निंबोणीच्या झाडामागे, छोरी, शर्मिष्ठा, उत्सव, वात्रटिका, मीरा, सलाम, गझल, भटके पक्षी, तुझे गीत गाण्यासाठी, बोलगाणी, चांदोमामा, सुट्टी एके सुट्टी, सूरदास, उदासबोध, त्रिवेणी, कबीर, राधा, गिरकी हे काव्यसंग्रह विशेष लोकप्रिय ठरले. त्यांच्या कवितांमध्ये चिंतनशील कविता, बालकविता, प्रेमकविता, निसर्गकविता असे वैविध्यपूर्ण विषय हाताळलेले आढळतात. सलाम, प्रेम म्हणजे प्रेम असतं, भोलानाथ, शतदा प्रेम करावे, जिप्सी, छोरी या त्यांच्या प्रसिद्ध कविता असून त्यांनी मीराबाई आणि कबिराच्या दोह्यांचा तसेच शेक्सपिअरच्या नाटकांचा अनुवादही केला आहे. या कविता, गीते, अनुवाद, लेखमालेपासून बोलगाण्यापर्यंत त्यांचे साहित्यविश्व पसरलेले आहे.
मराठी साहित्यविश्वात कविता हा गाऊन सादर करण्याचा प्रकार असताना पाडगांवकर-बापट-करंदीकर या त्रिकुटाने काव्य सादरीकरण हा नवा प्रकार मराठी विश्वात रुजू केला व जगभर त्याचे यशस्वी प्रयोगही केले. कवितेसह त्यांचा लेखसंग्रहही प्रकाशित झाला. त्यांच्या कर्तृत्वासाठी त्यांना १९८० साली साहित्य अकादमी पुरस्काराने तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. बा. भ. बोरकरांच्या कवितेच्या अनुकरणातून सुरू झालेला हा मराठी कवीचा आणि कवितेचा प्रवास कोणत्याही विषयाचे बंधन न बाळगता गेली ६३ वर्षे अव्याहत सुरू आहे. त्यांच्या लेखणीला मराठी साहित्यरसिकांनी कायमच सलाम केला असला तरी पद्मभूषण पुरस्काराच्या निमित्ताने आज त्यांच्या या लेखणीची शासनदरबारी दखल घेतली गेली. पाडगावकर यांना ‘सलाम‘ या कवितासंग्रहासाठी १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. तसेच त्यांना महाराष्ट्र भूषण, २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. निसर्ग आणि प्रेमभावना यांनाही त्यांच्या कवितेत प्रधान स्थान लाभले आहे. उपहासात्मक पद्धतीची कविता लोकप्रिय करण्याचे श्रेयही त्यांच्याकडेच जाते. बालगीते हा काव्यप्रकारही त्यांनी यशस्वीरीत्या हाताळला आहे. मीराबाईंच्या काही हिंदी गीतांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला. तब्बल ७० वर्षे मराठी साहित्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मंगेश पाडगावकर यांचे दि. ३० डिसेंबर २०१५ रोजी सकाळी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. निधनसमयी ते ८६ वर्षांचे होते. पाडगावकरांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
( लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)