
कथा : रमेश तांबे
सुमती पाटील वय वर्षे सत्तर. वृद्धाश्रमातल्या नोंदवहीत नाव लिहिलं गेलं आणि भरल्या घरात राहणाऱ्या सुमतीबाई अचानक वृद्धाश्रमात राहायला आल्या. भल्या मोठ्या दोन बॅगा त्यांच्याजवळ होत्या. विशेष म्हणजे त्या एकट्याच आल्या होत्या. घरातलं एकही माणूस त्यांच्यासोबत नाही हे पाहून वृद्धाश्रमातली मंडळी चकितच झाली. बाईंचं घरातल्या मंडळींबरोबर खूपच बिनसलंय हे साऱ्यांच्याच लक्षात आलं.
सुमतीबाई सत्तरीच्या होत्या. तरी तब्येतीने तशा ठणठणीतच होत्या. गोऱ्या गोमट्या सुमतीबाईंनी छान चष्मा लावला होता. डोक्यावरच्या केसांनी चंदेरी शाल पांघरलेली होती. गोड आवाजात बोलणाऱ्या सुमतीबाईंना बघताच सगळी मंडळी कुतूहलाने त्यांच्याकडे पाहू लागली. बाईंनी त्यांना हसून अभिवादन केले. साऱ्याजणी कुजबुजू लागल्या. चांगल्या घरातल्या दिसतायत, तरी पण वृद्धाश्रमात! का? घरात सुनेबरोबर पटत नाही वाटतं! पण बघा, घर सुटले तरी बाईंच्या चेहऱ्यावर दुःखाचा जराही लवलेश नाही. कुणीतरी कुजबुजले.
सुमतीबाई एका आठवड्यातच वृद्धाश्रमात छानपैकी रुजल्या. तिथल्या लोकांशी गप्पा मारू लागल्या. त्यांच्याशी खेळ खेळू लागल्या. सुमतीबाईंचा आवाज छान होता. त्यामुळे रोज गाण्यांच्या मैफली भरू लागल्या. त्यांना वाचनाचेही प्रचंड वेड होते. त्यामुळे सोबत आणलेल्या पुस्तकांबरोबरच वृद्धाश्रमात असलेल्या छोट्याशा ग्रंथालयाचा त्या वापर करायच्या. रोज बाहेर फिरायला जायचं, शेतामध्ये काम करायचं, बरोबरच्या स्त्री-पुरुषांशी गप्पा मारायच्या, त्यांची सुख-दुःख जाणून घ्यायची. वृद्धाश्रमातल्या स्वयंसेवकांनाही त्या मदत करायच्या. सुमतीबाई नेहमीच उत्साही आणि आनंदी असायच्या. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सगळ्यांना हवेहवसे वाटू लागले. याउलट बाकीची मंडळी नेहमीच निरुत्साही! घरातल्या आठवणीने रडायची, मुला-सुनांच्या नावाने खडे फोडायची. या असल्या जीवनाबद्दल खंत व्यक्त करायची; परंतु सुमतीबाई मात्र दिवसभर अत्यंत उत्साही असायच्या. रात्री देवाचं नामस्मरण करत झोपी जायच्या. पण त्यांच्या खोलीतील दिवे सगळे झोपले तरीसुद्धा चालूच असायचे. सगळ्यांना कुतूहल वाटायचं सुमतीबाई रात्री लवकर झोपत का नाहीत. रात्री बारानंतरच त्यांच्या खोलीतला दिवा बंद व्हायचा आणि पुन्हा सकाळी सगळ्यांच्या आधी ५ वाजता उठून त्या तयार असायच्या. थोड्याच दिवसांत सुमतीबाई वृद्धाश्रमात सगळ्यांच्या आवडत्या, अगदी गळ्यातल्या ताईत बनल्या. हा हा म्हणता वर्ष संपून गेलं आणि अचानक एक दिवस त्यांची नात, सुनबाई आणि मुलगा स्वतःची गाडी घेऊन त्यांना परत न्यायला आले. हे कसे काय विपरीत घडले! कारण वृद्धाश्रमातून असे पुन्हा परत आपल्या घरी कोणी गेले नव्हते. त्यामुळे सगळ्यांनाच मोठे आश्चर्य वाटले.
पण आज आपल्या आवडत्या सुमतीबाई जाणार म्हणून सारेच दुःखी झाले. त्यांच्यामुळे वृद्धाश्रमात एक प्रकारचे चैतन्य आले होते. पण आता त्या जाणार या कल्पनेनेच काही जणी त्यांच्या गळ्यात पडून रडत होत्या. आता सगळे जण हाॅलमध्ये जमले. आज वृद्धाश्रमाची संचालक मंडळीदेखील हजर होती. सगळे जण सुमतीबाईंबद्दल भरभरून बोलले. मग सुमतीबाई बोलायला उभ्या राहिल्या आणि जे काही सांगू लागल्या ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्या म्हणाल्या, “माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो वृद्धाश्रमातलं एक वर्ष कसं भरभर निघून गेलं. खरंतर सुरुवातीला तुमच्या नजरेत मला दिसत होतं, की या बाई वृद्धाश्रमात कशा आल्या. त्यांचं घरात मुला-सुनांबरोबर पटत नाही का! परंतु तसं काही नव्हतं. खरंतर मला वृद्धाश्रमातले जीवन, तिथल्या लोकांच्या समस्या या विषयावर अभ्यास करून एक प्रबंध लिहायचा आहे. एक पुस्तक लिहायचं आहे आणि म्हणून तो अनुभव घेण्यासाठी मी या ठिकाणी एक वर्ष राहिले. माझ्या वागण्यातून, बोलण्यातून वृद्धाश्रम जरी असला तरी आपण आपले जीवन आनंदाने कसे जगावे याची थोडीशी तरी कल्पना तुम्हाला नक्कीच आली असेल. आपण सगळ्यांनी मला जे प्रेम, सहकार्य दिलेत त्याबद्दल मी आपल्या सर्वांची ऋणी आहे आणि बाई थांबल्या. तोच वृद्धाश्रमातल्या एक बाई बोलू लागल्या. खरंच सुमतीबाई तुम्ही या वयात लेखन करता? वाचन करता! अरे हो म्हणूनच तुमच्या खोलीतला दिवा रात्री १२ वाजल्याशिवाय कधी बंद होत नव्हता. खरंच माणसानं आनंदी कसं जगावं, आपला वेळ कसा घालवावा. आपल्या आवडीच्या गोष्टी कशा कराव्यात आणि त्यातून स्वतः आनंद घेत इतरांना आनंद कसा द्यावा याचं एक आदर्श उदाहरण तुम्ही आम्हाला घालून दिलं आहे. आपण शिकवलेल्या नवीन नवीन गोष्टी आम्ही सातत्याने अमलात आणू आणि नेहमीच आनंदी राहण्याचा प्रयत्न करू. स्वतःला कामात, आपल्या छंदात रममाण करून घेऊ. आपल्या नव्या पुस्तकाची आम्हीदेखील वाट पाहू. धन्यवाद, ग्रेट सुमतीबाई... मग सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात, भरल्या डोळ्यांनी सुमतीबाईंना निरोप दिला.