
पुणे : गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाविरोधात दाखल झालेल्या याचिकेनंतर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने एमपीसीबी, पोलिसांनी उत्सवात मंडळांच्या आवाजाची पातळी मोजावी. तसेच मांडवातील ध्वनीप्रदुषणाबाबत जनजागृती करावी असे आदेश दिले आहेत. गतवर्षी पुण्यासह उपनगरांतील २०० मंडळांच्या आवारात आवाजाची मोजणी आणि जनजागृती केली होती. पोलिसांनी ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या १२४ गणेश मंडळांवर गुन्हे दाखल केले होते.
शहराच्या कोणत्या भागात किती आवाजाची पातळी असावी याचे निकष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) निश्चित केलेले आहेत. त्यानुसार यावर्षी गणेशोत्सवातील ध्वनिप्रदुषण रोखण्यासाठी एमपीसीबीने कंबर कसली आहे. मध्यवर्ती शहरासह उपनगरांत निवडलेल्या दोनशे गणेश मंडळांचे अकरा दिवस, तर पंधरा महत्वाच्या वर्दळीच्या चौकांमध्ये चार दिवस एमपीसीबीतर्फे आवाजाची मोजणी होणार आहे.
यावर्षी एपीसीबीने स्वारगेट, शिवाजीनगर, मध्यवर्ती पेठा, एरंडवणे, कोथरूड, सिंहगड रस्ता, सहकारनगर, बिबवेवाडी, कात्रज, खडकी, येरवडा, विश्रांतवाडी यांसह विविध भागांत दोनशे गणेश मंडळे निश्चित केली आहेत. तसेच वर्दळीचे चौकही यामध्ये निवडण्यात आले असून, तेथे मोजणीसाठी एका खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. हे पथक दररोज सायंकाळनंतर आवाजाच्या पातळीची नोद घेणार आहेत. ध्वनिप्रदुषण जनजागृतीसाठीएमपीसीबीने कॉलेजच्या तीनशे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. हे विद्यार्थी मंडळात ध्वनिप्रदूषाणामुळे मानवी आरोग्य, पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देतील. तसेच काही ठिकाणी ध्वनिमर्यादिचे फलकही लावले आहेत. यावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेली आवाजाची पातळी आणि सद्यस्थितीतील आवाजाचा आलेख आहे.
“गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती, प्रत्यक्ष आवाजाची मोजणी आणि उल्लंघन करणाऱ्या मंडळांची यादी तयार करणे अशा तीन पातळ्यांवर एमपीसीबी काम करणार आहे. पहिल्या दिवसापासून पथकांनी नोंदी घेण्यास सुरू केले आहे. मंडळांच्या परिसरातही जनजागृती आणि माहितीपर फलक लावले आहेत.” असे कार्तिकेय लंगोटे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांनी म्हंटले आहे.