
मुंबई : मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्याची आग्रही मागणी करत असलेल्या मनोज जरांगे यांनी मुंबईत येऊन आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जरांगेंसोबत त्यांचे शेकडो समर्थक मुंबईत आले आहेत. मुंबई पोलिसांनी जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना आझाद मैदानावर रविवार संध्याकाळपर्यंतच आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधरी महायुतीतील भाजपचे आमदार संजय केणेकर यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
मनोज जरांगे यांच्याकडे शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब म्हणून बघितले जात आहे, असे आमदार संजय केणेकर म्हणाले. जरांगे नावाच्या सुसाईड बॉम्बमुळे नुकसान होणार आहे. पण हे नुकसान पवारांचे असेल. शरद पवारांसाठी जरांगे नावाचा सुसाईड बॉम्ब एक बुमरँग ठरेल, असेही आमदार संजय केणेकर म्हणाले. पवार समाजाचे नुकसान करणारी कृती करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विषयीच्या वैयक्तिक द्वेषातून जरांगे या व्यक्तीला पुढे केले आहे, असे आमदार संजय केणेकर म्हणाले.
शरद पवारांनी वसंतदादांपासून आतापर्यंत जे जे त्यांना राजकीयदृष्ट्या आव्हान वाटले त्या सर्वांविरुद्ध कट कारस्थानं करुन त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. सध्या ते फडणवीसांना त्रास देण्याच्या प्रयत्नात आहेत. पण या प्रयत्नात ते यशस्वी होणार नाहीत, असा विश्वास आमदार संजय केणेकर यांनी व्यक्त केला.