भारतीय ऋषी - डॉ. अनुराधा कुलकर्णी
ॐ भूर्भुवःसः ।
तत्सवितुर्वरेण्यं ।
भर्गो देवस्य धीमहि ।
धियो यो नः प्रचोदयात् ।।
भगवान सूर्यनारायणाचे ध्यान करून त्याच्या महान तेजाने आपल्या बुद्धीला उत्तम कार्याची प्रेरणा मिळावी, म्हणून हजारो वर्षांपासून ज्या मंत्राचा जप सुसंस्कृत लोक करीत आले आहेत, त्या सुविख्यात गायत्री मंत्राचे द्रष्टे महर्षी विश्वामित्र होत. वैवस्वत मन्वंतरातीला सप्तर्षींमध्ये ब्रह्मर्षी वसिष्ठांसह त्यांची गणना होते. हे दोन्ही लोकोत्तर ऋषी समकालीन होते. त्यांच्यातला वाद आणि त्यांच्या संमीलनाने झालेले विश्वाचे कल्याण आपण मागच्या लेखात पाहिले. विश्वशांती यज्ञात विघ्न आणणाऱ्या राक्षसांचे पारिपत्य करण्यासाठी अयोध्येचा तेजस्वी राजकुमार श्रीराम याची मागणी महर्षी विश्वामित्रांनी अयोध्येचा राजा दशरथ याच्याकडे केली, तेव्हा त्या जोखिमीच्या कामाला आपल्या कोवळ्या पुत्राला पाठवायला दशरथाचे पितृहृदय तयार होईना, त्यावेळी अयोध्येचे कुलगुरू ब्रह्मर्षी वसिष्ठ यांनी दशरथराजाचे मन तयार केले. महर्षी विश्वामित्रांवर पूर्ण श्रद्धा ठेवण्यास सांगितले. यावरूनच विश्वामित्रांचे अलौकिक माहात्म्य सिद्ध होते.
कान्यकुब्ज देशाचा राजा गाधी याला सत्यवती नावाची कन्या होती. तिचा विवाह ऋचिक नावाच्या एका तपस्वीशी झाला होता. तेजस्वी पुत्रप्राप्तीसाठी ऋचिकने यज्ञ करून अभिमंत्रित केलेला एक चरू (भाताचा पिंड) सत्यवतीला दिला. सत्यवतीचे पिता गाधीराजे यांना पुत्र नसल्याने सत्यवतीने आपल्या मातेसाठीही एक चरू ऋचिकजवळ मागितला. तपस्वी ऋचिकने सत्यवतीसाठी ब्रह्मतेजयुक्त चरू व तिच्या मातेसाठी क्षात्रतेजयुक्त असे दोन मंत्राने प्रभावित केलेले चरू दिले. पण सत्यवतीसाठी दिलेला चरू अधिक प्रभावी असेल, या विचाराने तो तिच्या मातेने खाल्ला व स्वतःचा चरू सत्यवतीला भरवला. त्यामुळे गाधीराजाला क्षत्रिय कुलात जन्मूनही ब्रह्मतेजयुक्त असलेल्या पुत्राचा म्हणजे विश्वामित्रांचा लाभ झाला, तर सत्यवतीला ब्राह्मणकुलात जन्मूनही क्षात्रतेजयुक्त जमदग्नी यांचा लाभ झाला.
विश्वामित्रांचे जन्मनाव विश्वरथ होते. विश्वरथांची तीव्र बुद्धी व शक्तिशालीपण लहानपणापासूनच प्रतीत होत होते. त्यांनी अश्वविद्या, शस्त्रविद्या, शास्त्रविद्या, वेदविद्या अल्पकाळात प्राप्त केल्या. त्यांनी कान्यकुब्जचे आपले राज्य अत्यंत प्रभावीपणे सांभाळले होते. ब्रह्मर्षी वसिष्ठांनी आपल्या जवळची कामधेनू विश्वामित्रांना देण्यास नकार दिल्याने विश्वामित्रांनी त्यांच्यावर आपल्या प्रचंड सैन्यासह हल्ला केला, पण त्यात त्यांचा पराभव झाल्यामुळे अधिक प्रभावी सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी विश्वामित्र तपश्चर्येसाठी निघाले. मात्र या तपश्चर्येला जात असता त्यांची तपस्या भंग करण्यासाठी स्वर्गातील अप्सरा मेनका आली. विश्वामित्र तिच्याकडे आकृष्ट झाले. त्या उभयतांच्या संबंधात त्यांना एक कन्या झाली. तिचा जन्म होताच आपल्या तपश्चर्येचे भान येऊन मेनकेला व तिच्या कन्येला सोडून विश्वामित्र निघून गेले. मेनकेलाही आपल्या कन्येला टाकून स्वर्गात परत जावे लागले. तेव्हा या अजाण बालिकेचे रक्षण शकुंत पक्ष्यांनी केले आणि नंतर तिचा सांभाळ कण्वमुनींनी केला. शकुंत पक्ष्यांनी रक्षण केले म्हणून कण्वमुनींनी तिचे नाव शकुंतला ठेवले.
विश्वामित्रांनी उग्र तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न करून दिव्यास्त्र मिळविले आणि वसिष्ठांशी युद्ध करण्यास आले. पण तरीही वसिष्ठांपुढे त्यांची हार झाली. त्यावेळी क्षात्रतेजापेक्षा ब्रह्मतेज श्रेष्ठ हे जाणल्याने ब्रह्मतेजासाठी त्यांनी पुनश्च घोर तप केले; तरी वसिष्ठांनी त्यांना ब्रह्मर्षी न म्हटल्याने अत्यंत क्रोधित झालेले विश्वामित्र वसिष्ठांना ठार करण्यासाठी रात्री त्यांच्या आश्रमपरिसरात एकटेच आले. मात्र ब्रह्मर्षी वसिष्ठ त्यांच्या सहधर्मचारिणीशी बोलताना विश्वामित्रांच्या तपस्येची प्रशंसा करीत होते, ते ऐकून विश्वामित्रांच्या मनातला वसिष्ठांबद्दलचा क्रोध नाहीसा झाला. या दोन्ही महान ऋषींचे मनोमीलन झाल्यावर दोघांनी मिळून समाजव्यवस्थेला, राजव्यवस्थेला उत्तम वळण लावले. ब्रह्मर्षी झालेल्या विश्वामित्रांचे आता राजपद सोडून अखंड साधनेसाठी वनात वास्तव्य होते.
वनात फिरताना एकदा त्यांना कडकडून भूक लागली होती. मोठ्या प्रयत्नांनी गोडे खाद्यपदार्थ मिळवून जेव्हा ते भोजनास बसले तोच एक धर्म नावाचे ऋषी तेथे आले व त्यांनी विश्वामित्रांकडे भोजन मागितले, विश्वामित्रांनी त्यांचे ताट वाढले. तोच धर्मऋषी तेथून अदृश्य झाले आणि बऱ्याच काळाने परत आले तरी विश्वामित्र स्वतः न जेवता त्यांची वाट पाहात उभेच होते. त्यांची ती तितिक्षा वंदनीयच होती. एकदा एका नरमेध यज्ञात वधस्तंभाला बांधलेल्या पुनःशेप नावाच्या मुलाचा करुण विलाप ऐकून विश्वामित्रांचे मन द्रवले. त्यांनी त्या मुलाला तेथून सोडविले, म्हणजेच ही भयंकर अनिष्ट प्रथा बंद केली. यज्ञप्रसंगी बळी न देता श्रीफळ वा सुपारीचा वापर करण्याचा संकेत महर्षी विश्वामित्रांपासून सुरू झाला. - (पूर्वार्ध)