
ऋतुराज - ऋतुजा केळकर
गणपती बाप्पा म्हणजे केवळ एक देव नव्हे, तर आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. तो सकाळच्या मंद वाऱ्यासारखा, संध्याकाळच्या तुळशीच्या सुवासासारखा आपल्या जीवनात नित्य उपस्थित असतो, कधी मंत्रात, कधी मनात. गणेशोत्सव हा सण आहे, पण त्याचबरोबर तो एक सामाजिक, पर्यावरणीय आणि आध्यात्मिक जागर आहे. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक रूप दिलं आणि भक्तीला समाजजागृतीचं तेज बहाल केलं. त्यांच्या दूरदृष्टीमुळे गणपती बाप्पा घराघरांत विराजमान होण्याऐवजी मनामनात स्थिरावले आणि हा उत्सव एकतेचा मंत्र बनला.
गणपतीच्या रूपात आपल्याला बुद्धी, समजूत आणि स्थैर्य यांचा संगम दिसतो. “ॐ गं गणपतये नमः” हा मंत्र उच्चारताच जणू संपूर्ण विश्व थांबून त्याला वंदन करतात. त्याच्या सोंडेच्या वळणात ब्रह्माचा नाद आहे आणि त्या नादात मनाला शांततेचा दीप मिळतो. गणेशोत्सवात लोककला फुलते ती शाडूच्या मातीपासून साकारलेली मूर्ती, ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक नृत्य आणि फुलांनी सजवलेली मंडपं यातून. ही सजावट केवळ सौंदर्य नाही, तर लोकभावनेचं अभिव्यक्ती माध्यम आहे. प्रत्येक हातातली आरती, प्रत्येक मुखातला मंत्र आणि प्रत्येक मनातली श्रद्धा हे खरंतर या सणाचं खरं तेज आहे. गणपतीचं रूप हे केवळ सौंदर्याचं नाही, तर गहन प्रतीकात्मकतेचं दर्शन आहे. त्याचं हत्तीचं डोकं हे विशालतेचं आणि बुद्धीचं प्रतीक आहे. ज्यात स्मरणशक्ती प्रबळ, वैचारिक स्थिरता असावी हे सांगते. त्याची सोंड ही लवचिकतेची आणि शक्तीची ओळख आहे जी की वेळ पडली तर वृक्ष उखडू शकते पण नम्रतेने अभिवादनही करू शकते. मोठे कान हे एकाग्रतेचं प्रतीक आहेत. ज्ञान श्रवणातूनच येतं आणि गणपतीचे कान जणू गुरूंच्या मंत्रासाठी सदैव सज्ज असतात. त्याचे लहान डोळे सूक्ष्म निरीक्षणाचे प्रतीक आहे. जिथे प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहण्याची वृत्ती आहे. एकदंत म्हणजे एकाग्रता आणि अडथळ्यांवर मात करण्याची ताकद. त्याच्या मोठ्या पोटात चांगलं-वाईट सगळं सामावून घेण्याची क्षमता आहे, जणू जीवनाच्या विविध अनुभवांना समजून घेणारा ज्ञानी योगी.
त्याच्या चार हातांतील वस्तूंमध्येही गूढ अर्थ आहे, कुऱ्हाड मोहाच्या बंधनांना तोडण्याचं प्रतीक, दोरी भक्ताला परमात्म्याशी जोडणारी, मोदक तपश्चर्येच्या गोड फळाचं प्रतीक आणि आशीर्वाद देणारा हात म्हणजे शुभेच्छा, संरक्षण आणि कृपेचा स्रोत म्हणूनच गणपतीचं संपूर्ण रूप हे एक जीवनशैलीचं मार्गदर्शन आहे जिथे बुद्धी, नम्रता, एकाग्रता आणि सहिष्णुता यांचा संगम आहे. त्याचं दर्शन म्हणजे आत्मपरीक्षण आणि त्याचं स्मरण म्हणजे अंतर्मनात स्थैर्याचा दीप.
पर्यावरणाशी एकात्मता हे गणेशभक्तीचं नवं रूप आहे. शाडूच्या मूर्ती, नैसर्गिक रंग, प्लास्टिकमुक्त सजावट आणि विसर्जनासाठी पर्यायी उपाय हे भक्तीला कृतीची जोड देतात. गणेशोत्सव म्हणजे समाजाची एकात्मता. शाळा-कॉलेजांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम यामुळे तरुणांना नेतृत्वाची संधी मिळते. गणपती बाप्पा घराघरांत विराजमान होतो, पण मनामनात स्थिरावतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात गणेशभक्ती हे मानसिक आरोग्याचं आश्रयस्थान आहे. मंत्र, आरती आणि प्रसाद हे केवळ धार्मिक क्रिया नाहीत, तर मनाच्या आरोग्याचे उपचार आहेत. ‘गं’ या बीजमंत्रात जसा नाद आहे, तसाच नाद पाण्याच्या प्रत्येक थेंबात आहे, शांत पण प्रभावी.
गणपती आपल्याला शिकवतो की, प्रत्येक आरंभात शुभतेची ओढ असावी, प्रत्येक कृतीत करुणेचा स्पर्श असावा आणि प्रत्येक विचारात सहिष्णुतेचं बीज असावं. त्याचं अस्तित्व हे केवळ पूजेत नाही, तर पर्यावरणाच्या संवर्धनात, समाजाच्या समतेत आणि अंतःकरणाच्या गहिराईत आहे. शब्द संपले तरी गजाननाचं अस्तित्व संपत नाही - तो मंत्रात नाही, तर मनात आहे आणि मनाच्या गाभाऱ्यात जिथे शांती नांदते, तिथेच त्याचं खरं निवासस्थान आहे.