
मनस्विनी : पूर्णिमा शिंदे
माणूस जेव्हा रागात असतो, तेव्हा तो विचारशून्य होतो. विचारशून्यतेमुळे विवेक राहत नाही. त्यामुळे योग्य, अयोग्य याचा निर्णय माणूस घेऊ शकत नाही. एखादा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी शांतचित्ताची आवश्यकता असते. मात्र, राग आल्यावर माणूस अशांत होतो, त्यामुळे राग आल्यावर नेमकेपणा हरवतो, आपल्याला नक्की काय करायचे आहे, हे माणसाला समजत नाही. त्यामुळे राग आल्यावर माणसाने काय करावे हे या लेखातून सांगण्यात आले आहे.
राग आपल्याला माहीतच आहे. समाजामध्ये प्रत्येकाला राग हा येतोच पण तो किती कधी? कसा? कुठे यावा? यालाही काही मर्यादा असतात. समाजामध्ये माणूस एकमेकांशी आपलं नाव, ओळख, प्रतिष्ठा, इज्जत व्यक्तिमत्त्व या भूमीवर अवतरत असतो. त्यामुळेच तो ओळखला जातो. राग म्हणजे काही मोठं मिरवण्यासारखी गोष्ट नाही. आपल्या पूर्वजांनी एक म्हण केलेलीच आहे.
अति राग आणि भीक माग, तर हा जो अति राग असेल तर किती घातक आहे आपण पाहूया. राग म्हणजे सुखाचा जीव दुःखात टाकणे. धोक्यात आणतो. सुखशांती नष्ट करून स्वतःसह इतरांचीही अपरिमित हानी करतो. हे नुकसान कधीही भरून न येणारे असते. त्याचबरोबर या रागाने आपली शक्ती, वेळ, पैसा, नाती यांचीही हानी होते. म्हणजे जसे बघाना एखाद्यावर रागाने जोरजोरात आपण भांडलो, तर त्रास हा आपल्यालाच होतो. रक्तदाब वाढतो, शुगर वाढते, ब्रेन हॅमरेज होतं, पॅरालिसिस होतो, चक्कर येणं, भान हरपणे, वेड लागणे त्याचप्रमाणे माणसं अगदी टोकाचे निर्णयसुद्धा घेतात. त्या भांडणातून तुम्ही काय केले? ते नाते तोडले तर मग पश्चातापाची वेळ येते. काम, क्रोध, मद, माया, मोह, मस्तर हे षडरिपू माणसाला डसत असतात. डसणे म्हणजे चावणे! संत एकनाथांचा ‘विंचू चावला’ हे भारुड देखील याच प्रकारावर आहे. जीवन जगत असताना प्रापंचिक जीवनात येणाऱ्या अडचणींमध्ये परिस्थिती निर्माण होते. त्या त्या वेळेला माणसांना ज्या षडरिपुंचा मनावर ताबा चढतो. संत विभूती भारुडातून आपल्याला हेच तर सांगते की तुम्ही शांत राहा. अति राग, अति मद, अति मोह, अति माया. अति द्वेष, तीमतसर हे सगळे विषासारखे आहेत. त्यातून निष्पन्न काहीच होणार नाही. जिथे गोडीने सुई काम करू शकते. तेथे तेच काम कैचीने कापून होणार नाही. जिथे विटेने घर बांधले जाते, तीच विट भिंत बांधून विटेची भिंत नात्यात उभी केली, तर ती भिंत उभी राहते. राग ही अशी गोष्ट आहे की रागाच्या भरात अशा गोष्टी घडतात की त्या मानवतेला साजेशा नसतात.
राग आल्यावर एखाद्या माणसाकडून आदळआपट, अक्रस्थळेपणा समोरच्याच्या जीवावर उठणे, हातात असेल ते मारणे, फेकणे, अपशब्द, वाचाळ, शिव्या देणे त्याचप्रमाणे अंगावर धावून जाणे हा प्रकार घडतो. तेव्हा काय करावे? समोरच्याचे बोलणे ऐकून समजून घ्यावे. सतत भांडावून सोडू नये. आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्याच्यावर दडपण आणू नये. आपली मते मांडण्याची संधी द्यावी. आपली मते इतरांवर लादू नये. वादातून टोकाचे निर्णय घेऊ नये.
रागावरती उपाय काय काय असावेत? वर्तन परिवर्तन हे घडवावे. एक ते दहा उलटे अंक मोजून विचार करावा. विवेक साधावा. शांत राहून एक ग्लास पाणी प्यावे. नामस्मरण करावे. जाणीव ठेवावी. आपण समोरच्या जागी असतो तर काय केले असते? सर्वात महत्त्वाचे संयम, शिस्त आणि मानवता असावी. आपण काही जनावरं नाही माणूस म्हणून बघा. एक तर अशा व्यक्तीपासून लोक लांब जातात नाहीतर जवळ येत नाहीत किंवा जवळ उभे करत नाहीत आणि संबंध टाळतात. अशा व्यक्तींना ध्यानधारणा, मनोबल, मनस्वास्थ्य वाढवणे, वास्तवाला स्वीकारणे, परिस्थितीशी जुळवून घेणे, समोरच्याला समजून घेणे, देवावर श्रद्धा ठेवणे, स्वतःवर विश्वास ठेवणे, एखादा छंद जोपासणे, नवनिर्मिती, सर्जनशीलता, संवेदनशीलता, सृजनभान ठेवणे गरजेचे असते. आपल्यातील रजोगुण आणि तमोगुण जेव्हा वाढतो तेव्हा चिडचिड होते. सतत भांडणे करणे, आक्रस्थाळेपणा करणे, द्वेष करणे हे सगळे रागाचे दुष्परिणाम आहेत. पश्चातापाशिवाय माणसाच्या हाती काहीच लागत नाही म्हणून स्वतःसह इतरांचा विचार करावा. राग आल्यास बुद्धीवर, मनावर नियंत्रण असायला हवे.
वातावरणात मिठाचा खडा पडतो, उत्साहावर पाणी पडते, नकारात्मकता येते, निरुत्साही, नैराश्य, भयग्रस्त, आळशीपणा त्याचप्रमाणे मनोबल खचते. स्वतःसह इतरांनाही सुख न देता आपण स्वतःही सुखापासून वंचित राहतो विस्फोटक असा आहे. राग जिथे जाईल तिथे भूत, हैवानासारखा नाचतो. स्वतःच इतरांच्या आयुष्यात युद्ध प्रसंग निर्माण करतो. म्हणून या रागापासून चार हात दूर राहिलेलेच बरे. चार माणसात बसायचं, उठायचं असेल तर आपला हा राग गुंडाळून कुठेतरी लांब फेकून ठेवून द्या. तरच आपल्याला सुखाने आयुष्य जगता येईल. भावभावनांवर नियंत्रण ठेवावे. शांत, संयमी राहावे.