
पाटणा : भारतीय संघाने आशिया कप हॉकी स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. रंगतदार लढतीत भारतीय संघाने जपानवर ३-२ असा विजय मिळवला. या विजयासह भारत पूल अ पॉइंट टेबलमध्ये नंबर-१ वर पोहोचली आहे.
राजगीर येथील बिहार स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी हॉकी स्टेडियमवर मनदीप सिंगच्या गोलने भारताने आघाडी घेतली. त्याने तिसऱ्या मिनिटाला फील्ड गोल केला. त्यानंतर ५ व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. हाफ टाइमपर्यंत भारतीय हॉकी संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये जपानने कवाबे कोसेईच्या गोलने सामन्यात पुनरागमन केले. कोसेईने बॅक हँड शॉट मारला आणि चेंडू गोलपोस्टच्या आत ढकलला. चौथ्या क्वार्टरच्या अगदी आधी भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. हा हरमनप्रीतचा दुसरा आणि भारतीय संघाचा तिसरा गोल होता. शेवटच्या शिट्टीच्या अगदी आधी जपानच्या कावाबे कोसेईने आपला आणि संघाचा दुसरा गोल केला. पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.