Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

ठाण्यात ८० हजार कुटुंबांचे धोकादायक इमारतींत वास्तव्य

ठाण्यात ८० हजार कुटुंबांचे धोकादायक इमारतींत वास्तव्य

इमारती रिकाम्या करण्यास रहिवाशांचा विरोध

ठाणे : विरारमध्ये इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ठाण्यातही धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीमध्ये नागरिकांचे वास्तव्य असून अशा इमारतीमध्ये अजूनही तब्बल ८० हजार कुटुंबे राहत आहेत. एकदा राहते घर सोडले की हक्काचा निवारा गमावून बसण्याच्या भीतीपोटी रहिवासी इमारती रिकाम्या करण्यास तयार नाहीत. या इमारती रिकाम्या करताना पालिका प्रशासनाची मात्र चांगलीच दमछाक होत आहे.

विरारच्या घटनेनंतर ठाण्यातील अतिधोकादायक व धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणेकरांवर मृत्यूची टांगती तलवार कायम असून ३ लाख २७ हजार २९० ठाणेकरांचा मुक्काम मृत्यूच्या छायेत आहे. ठाणे महापालिका हद्दीत ९३ इमारती अति धोकादायक तर २०० धोकादायक आहेत.

ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक, अति धोकादायक आणि बेकायदा इमारतींचा प्रश्न लटकलेला आहे. अशातच शहरातील शेकडो धोकादायक इमारतीमध्ये लाखो ठाणेकर जीव मुठीत घेऊन संसाराचा गाडा हाकत आहेत. एकीकडे क्लस्टर योजनेचे स्वप्न दाखवण्यात आले असताना अद्याप क्लस्टर योजनेची इमारत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे हक्काचे घर मिळेल या आशेने इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये धडकी भरत आहे.

प्रशासनाकडून दरवर्षी धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करण्यात येते. त्यानुसार ९ प्रभाग समितीमधील अतिधोकादायक व धोकादायक इमारतीची यादी पालिकेने शनिवारी जाहीर केली आहे.

Comments
Add Comment