Sunday, October 26, 2025
Happy Diwali

वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला

वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला

बीड (प्रतिनिधी): जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. कारण, बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी पार पडली. या दरम्यान न्यायालयाने आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे, वाल्मिकच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून तुरुंगातून त्याची सुट्टीच नाही, हे स्पष्ट झाले आहे.

दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा संबंध कशाप्रकारे नाही, असा युक्तिवाद मागील सुनावणीत कराडच्या वकिलांच्या माध्यमातून तब्बल तीन तास करण्यात आला होता. या प्रकरणात वाल्मिक कराडला जामीन मिळावा यासाठी विशेष न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर निर्णय देत शनिवारी न्यायालयाने हा अर्ज नामंजूर करत फेटाळून लावला. वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हा दाखल असल्याने कराडचा अर्ज फेटाळत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. सरपंच देशमुख हत्याप्रकरणातअद्याप एक आरोपी फरार आहे.

दोषमुक्ती अर्जावर १० सप्टेंबर रोजी सुनावणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपींचे जामीन आणि दोषमुक्ती अर्जावर शनिवारी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयात झालेल्या सुनावणीत काही आरोपींच्या अर्जांवर निर्णय राखून ठेवण्यात आला. तर काही अर्जांबाबत मूळ फिर्यादीचे म्हणणे न्यायालयासमोर न आल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या खटल्यातील महत्त्वाचा आरोपी वाल्मिक कराड याच्या जामिनाबाबत निर्णय देत जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. काही आरोपींनी केलेल्या दोषमुक्तीच्या अर्जावरील सुनावणी १० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

Comments
Add Comment