Saturday, August 30, 2025

मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने लागू केला आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. लाखो मराठा आंदोलक मुंबईत ठाण मांडून आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा कुणबी नोंदींसाठी नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्यापाठोपाठ आता वंशावळ समितीलाही आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आला होता. याला अनुसरून तालुकास्तरीय वंशावळ समितीस उच्चस्तरीय समितीच्या मुदतवाढीपेक्षा किमान सहा महिने अधिक मुदत देण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात आला होता. त्यानुसार या समितीचा कार्यकाळ ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. या समितीस २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतूदी लागू राहतील, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. या समितीला कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशवाळ जुळविण्याची कार्यवाही करण्

शिंदे समिती आणि जरांगेंची चर्चा निष्फळ !

मराठा आरक्षणाची ओबीसी कोट्यातून मागणी करत आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी भेट घेतली. संदीप शिंदे हेच यासंदर्भातील समितीचे अध्यक्ष आहेत. या भेटीत हैदराबाद गॅझिटियरच्या नोंदीनुसार मराठ्यांना प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगेंनी शिंदे यांच्याकडे केली. याबाबत यापूर्वीच मंत्रिमंडळानं निर्णय घेतला असून त्याकरता किमान सहा महिन्यांचा अवधी लागेल, असे शिंदे यांनी जरांगेंना सांगितले. मात्र, मराठा समाजाला तात्काळ कुणबी घोषित करा, जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत इथून उठणार नाही, असा पवित्रा मनोज जरांगेंनी घेतला आहे. ‘मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालेच पाहिजे, त्यासाठी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी घोषित करा. ५८ लाख नोंदी उपलब्ध असल्याने आता मराठा कुणबी असल्याचा आणखीन वेगळा काय पुरावा पाहिजे?’, असा सवाल मनोज जरांगेंनी उपस्थित केला. ‘ओबीसींना सरसकट आरक्षण दिले जात, मग मराठ्यांना का नाही?, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा पट्यातील मराठा हा कुणबीच आहे,’ असा दावा देखील मनोज जरांगेंनी केला आहे.

जरांगेंच्या आवाहनानंतर वाहतूक कोंडी फुटली

सरकारने आंदोलकांसाठी कोणतीही सोयीसुविधा उपलब्ध न केल्याने शनिवारी सकाळी आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी मुंबई महानगरपालिका व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील रस्त्यावर ठिय्या मांडले. काहींनी महानगरपालिकेसमोर शेगडी पेटवत नाष्टा बनविला तर काहींनी थेट कृत्रिम तलाव उभारून त्यात अंघोळ केली. यामुळे सकाळी ८ वाजल्यापासून या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. ही कोंडी फोडण्यासाठी पोलिसांकडून करण्यात येत असलेले प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याने अखेर त्यांनी मनोज जरांगे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर जरांगे यांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केल्यानंतर दुपारी १२ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास आंदोलक बाजूला झाल्याने अखेर साडेचार तासांनंतर वाहतूक कोंडी फुटली.

मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक रद्द

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मराठा आंदोलक मुंबईत येण्यासाठी प्रचंड धावपळ करत आहेत. ज्या मार्गाने, ज्या वाहनाने मुंबई गाठता येईल, तशी मुंबई गाठून मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दिला जात आहे. अशात मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी मेगाब्लॉक घेतला असता तर वाशी एक्झिबिशेन सेंटर वा इतर ठिकाणाहून आझाद मैदानावर येणाऱ्या मराठा आंदोलकांची मोठी गैरसोय झाली असती. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक रद्द केल्याने, हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा सुरू राहील. त्यामुळे पनवेल, वाशी, नेरुळ, रे रोड, शिवडी, डॉकयार्डवरून ये-जा करणाऱ्या मराठा आंदोलकांना दिलासा मिळाला.

आणखी एका आंदोलकाचा मृत्यू

मुंबई येथे आंदोलनात सहभागी असलेल्या विजय घोगरे या मराठा कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झालाय. हा तरुण लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, त्याला उपचारासाठी जे.जे रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरने या कार्यकर्त्याला मृत घोषित केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा