Monday, October 20, 2025
Happy Diwali

विदर्भात सार्वजनिक उत्सवांना प्रारंभ

विदर्भात सार्वजनिक उत्सवांना प्रारंभ

श्रावण महिन्यात घरोघरी सणांची रेलचेल असते तर भाद्रपद सुरू झाला की सार्वजनिक उत्सव मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. भाद्रपदाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे पोळ्याच्या करीला विदर्भात त्यातही नागपुरात मारबत नावाचा सार्वजनिक उपक्रम दरवर्षी साजरा होत असतो.

श्रावण महिन्यात पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे डास-माश्या इत्यादींचे प्रमाण वाढलेले असते. तसेच पावसाळ्यामुळे रोगराईसुद्धा वाढते. श्रावण संपला की हे सर्व संपावे म्हणून श्रावणाच्या शेवटच्या दिवशी सर्वजण घराबाहेर पळसाच्या झाडाची फांदी घराबाहेर ठेवतात आणि भाद्रपदाच्या पहिल्या दिवशी सकाळी त्या फांदीने घरातील केरकचरा झाडून तो गावाबाहेर नेऊन जाळतात. त्याला मारबत असे म्हटले जाते. त्यावेळी गंडा पिडा, माश्या मुरकुटे, रोगराई, किडे किटकुले घेऊन जाय गे मारबत, अशा घोषणाही दिल्या जातात. या घरगुती प्रकाराला सार्वजनिक स्वरूप आले ते इंग्रजांच्या काळात. झाले असे की इंग्रज हे नागपूरकर भोसले यांचे संस्थान ताब्यात घेऊन त्यांना आपले मांडलिक बनवण्याच्या मागे होते. मात्र नागपूरकर भोसले आपल्या मोजक्याच सैन्यानिशी त्यांच्याशी लढा देत त्यांना हाकलून लावत होते. फोडा आणि झोडा ही इंग्रजांची नीती, त्याचाच वापर मग इंग्रजांनी केला. भोसले परिवारातील एक दुखावलेली आणि सत्तेसाठी हपापलेली बाकाबाई भोसले हिला इंग्रजांनी हाताशी धरले. ती देखील सत्तेसाठी फितूर झाली आणि तिने चोरवाटेने इंग्रजांना नागपुरात घेतले. मग भोसले यांचे सैन्य निष्प्रभ ठरले आणि इंग्रजांनी त्यांना मांडलीक केले.

बाकाबाईच्या या कृत्याबद्दल जनसामान्यांच्या मनात त्यावेळी संताप होता. मात्र इंग्रजांचे राज्य सुरू झाले होते. त्यामुळे उघडपणे लोकांना संताप व्यक्त करता येत नव्हता. नागपूरच्या महाल परिसरात आज जिथे सिटी कोतवाली पोलीस स्टेशन आहे, तिथे बाकाबाईचा वाडा होता. त्यावेळी पोळा जवळ येत होता. मग संतप्त देशप्रेमी नागरिकांनी बाकाबाईचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्याला चपला जोड्यांनी मारत आणि शिव्या शाप देत निर्वत मिरवत तिच्या वाड्यासमोर आणले. तिथे तिच्या नावे शिमगा केला गेला आणि मग ती मारबत पुढे नेऊन भोसलेंच्या पारंपरिक स्मशानभूमीत जाळली गेली. त्यावेळी बाकाबाईच्या निषेधार्थ काळी मारबत आणि पिवळी मारबत अशा दोन मारबती निघाल्या होत्या. तेव्हापासून मग दरवर्षी या मारबती निघू लागल्या. बाकाबाई जिवंत असेपर्यंत तिच्या वाड्यासमोर थांबून तिच्या नावे शिमगा केला जात असे. त्याच वेळी मग समाजातील इतर कुप्रथा, राजकीय दुष्प्रवृत्ती, इंग्रजांची जुलमी राजवट यांच्याही मारबती काढणे सुरू झाले. त्यात स्त्री रूपात असली तर ती मार्बल आणि पुरुष रुपातील बडग्या असे स्वरूप त्याला दिले जाऊ लागले स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ती प्रथा सुरू राहिली. आजही ही प्रथा सुरू असून दरवर्षी या मारबती उत्साहात निघतात आणि समाजातील व्यंगांवर टीका करत त्या संपूर्ण परिसरात फिरवल्या जातात आणि मग त्या जाळल्या जातात. या प्रथेला जवळजवळ दीडशे वर्षं झाली असल्याचे बोलले जाते. यंदा देखील गेल्या शनिवारी म्हणजेच पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत नागपुरात उत्साहात पार पडली.मारबतीची सुरुवात साधारणपणे सकाळी १० पासून होते. त्यामुळे इतवारी चौक, बडकस चौक, सिटी कोतवाली, गांधी गेट, शिवाजी पुतळा, टिळक पुतळा, शुक्रवार तलाव या रस्त्यावर हजारो नागरिकांनी मारबत बघायला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

यात नियमित काळीमारबत आणि पिवळी मारबत या दोन मारबती वगळता भारतावर टॅरिफ लावून अडचणीत आणू बघणारे डोनाल्ड ट्रम्प, लव जिहाद, स्मार्ट मीटर, नीता रूड हत्याकांड, ईव्हीएम मशीनचा निषेध, पीओपी मूर्तींचा निषेध, पहेलगामचा दहशतवादी हल्ला अशा विविध सामाजिक घटनांवर आधारित जवळजवळ १५ ते १७ मारबती आणि बडगे निघाले होते. इडा पिडा रोगराई माश्या मुरकुटे घेऊन जाय गे मारषत अशा घोषणा देखील ढोल-ताशांच्या गजरात यावेळी दिल्या जात होत्या. भाद्रपद महिन्यातील लगेचच येणारा दुसरा सार्वजनिक उत्सव म्हणजे गणेशोत्सव, यंदादेखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपूर्ण विदर्भातच साजरा होतो आहे. एकट्या नागपूर शहरात जवळजवळ हजारापेक्षा अधिक सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होत आहेत, महाल परिसरातील चितार ओळ इथे गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात निर्माण कार्य चालत असते. बहुतेक सर्व मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तिथेच गणेशमूर्ती नोंदवत असतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळपासूनच चितार ओळीचा बाजार अक्षरशः गजबजला होता. बहुतेक सर्व मंडळांचे कार्यकर्ते तिथे येऊन ट्रक, फाईव्ह व्हीलर, ऑटो रिक्षा अशा तत्सम वाहनांमध्ये वाजत गाजत आपली गणेश मूर्ती घेऊन जात होते. त्यामुळे ढोल-ताशांच्या गजराने तो परिसर दुमदुमून गेला होता.

फक्त चितार ओळच नाही, तर जिथे जिथे गणेशमूर्तींची स्थापना झाली त्या परिसरात देखील ढोल-ताशांच्या गजराने परिसर दणाणला होता. सर्व मंडळांनी आपापल्या परिसरात गणेशमूर्तीला मिरवणुकीने वाजत-गाजत नेले होते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण देखील होत होती, या निमित्ताने घरगुती गणपती घेण्यासाठी देखील नागरिकांची लगबग दिसून येत होती. लहान मूर्तींची दुकाने प्रत्येक वस्तीत लागलेली दिसत होती. तिथे मूर्ती घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मूर्तीसोबत मखर सजावटीचे सामान याचीदेखील दुकाने मोठ्या प्रमाणात लागलेली दिसून येत होती, बुधवारी गणरायाचे आगमन होत असतानाच पावसाने दिवसभर सातत्याने हजेरी लावली होती. त्यामुळे ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. परिणामी गणेशोत्सव मंडळ आणि सामान्य नागरिक यांची चांगलीच धावपळ सुरू झालेली दिसत होती, आता सर्व ठिकाणीच्या गणेशाची प्रतिष्ठापना झालेली आहे. सजावटीचे कामही पूर्ण होत आले आहे. ठीक ठिकाणी वेगवेगळे देखावे बनवून मूर्तींची सजावट केलेली आहे. त्यामुळे आता हळूहळू दर्शन घेणाऱ्यांची गर्दी देखील वाढताना दिसते आहे. हळूहळू जसे जसे दिवस पुढे जातील तशी तशी मूर्तींना भेट देणाऱ्यांची आणि दर्शन घेणाऱ्यांची गर्दी देखील वाढेल हे नक्की.

- अविनाश पाठक

Comments
Add Comment