Sunday, October 19, 2025
Happy Diwali

पंतप्रधान मोदी सात वर्षांनंतर चीन दौऱ्यावर, जिनपिंग आणि पुतिनना भेटणार

पंतप्रधान मोदी सात वर्षांनंतर चीन दौऱ्यावर, जिनपिंग आणि पुतिनना भेटणार

तियानजिन : जपानच्या दौऱ्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर आहेत. ते विशेष विमानाने चीनमधील तियानजिन शहरात पोहोचले. तियानजिन शहरात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची शिखर परिषद होणार आहे. या परिषदेत पंतप्रधान मोदी, चीनचे अध्यक्ष जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि एससीओचे अर्थात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे सदस्य असलेल्या इतर देशांचे नेते अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा करतील.

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सात वर्षांनंतर चीनचा दौरा करत आहेत. ते एसीओच्या बैठकीत सहभागी होतील तसेच एससीओच्या सदस्य देशांच्या नेत्यांशी स्वतंत्र द्वीपक्षीय चर्चा करण्याचीही शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग तसेच मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यात द्वीपक्षीय चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

मोदींचे चीनमध्ये तियानजिन शहरात चीनकडून जोरदार स्वागत झाले. मोदींच्या स्वागतासाठी लाल गालिचा अंथरण्यात आला होता. पंतप्रधान मोदींचे आगमन होताच चिनी महिला कलाकारांनी नृत्य करुन त्यांचे स्वागत केले. याआधी २०२४ मध्ये रशियातील काझान येथे आणि २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत मोदी आणि जिनपिंग यांची भेट झाली होती. आता एससीओच्या निमित्ताने मोदी आणि जिनपिंग पुन्हा एकदा भेटणार आहेत. ही भेट तियानजिन शहरात होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच चीनचे परराष्ट्रमंत्री भारत - चीन सीमाप्रश्नावरील चर्चेसाठी दिल्लीत येऊन गेले होते. तर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आणि चीनवर ३० टक्के टॅरिफ लादला आहे. या पार्श्वभूमीवर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग तसेच रशियाचे अध्यक्ष पुतिन हे चीनमधील तियानजिन शहरात भेटणार आहेत. यामुळे या भेटीत काय घडते याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >