
मुंबई : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन सरसकट आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी मुंबईत आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण सुरू केले. जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी शनिवार ३० ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंतच परवानगी दिली आहे. यामुळे मुदत संपल्यानंतर पुढे काय होणार हा प्रश्न आहे.
जरांगेंच्या आंदोलनामुळे पोलिसांच्या सुट्या रद्द
मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू असल्यामुळे मुंबई पोलीस दलातील सुटीवर असलेल्या पोलिसांना तातडीने ड्युटी जॉइन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व पोलिसांना ड्युटीवर हजर राहण्याचे आणि कायद्याच्या चौकटीत राहून आपापल्या वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आधीच गणेशोत्सवामुळे मुंबई पोलिसांवर सुरक्षेचा ताण आहे. हा ताण असतानाच जरांगेंनी आंदोलन सुरू केल्यामुळे मुंबई पोलिसांवरील कामाचा ताण वाढला आहे.
आंदोलनामुळे रस्ते वाहतूक मंदावली
मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर फक्त पाच हजार समर्थकांसह आंदोलन करण्यासाठी जरांगेंना परवानगी दिली होती. प्रत्यक्षात आझाद मैदानावर परवानगीपेक्षा जास्त आंदोलक गोळा झाले आहेत. मुंबईत मध्यरात्री झालेल्या पावसामुळे आझाद मैदानावर चिखल झाला आहे. या चिखलाचे कारण देत मैदानावर खडी टाकण्याचा आग्रह जरांगे समर्थक करत आहेत. या मागणीसाठी शेकडो जरांगे समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळच्या रस्त्यावर काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. जरांगे समर्थकांच्या आंदोलनामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळच्या रस्त्यावर काही काळ वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडली होती. अनेक जरांगे समर्थकांच्या गाड्या अजूनही वेगवेगळ्या गावांतून मुंबईत येत आहेत. यामुळे वाशी खाडी पूल तसेच मुंबई ठाण्याच्या वेशीवर सकाळपासूनच वाहतुकीचा वेग मंदावला आहे. पोलिसांनी जरांगे समर्थकांना टोल नाक्यांजवळच्या मोकळ्या जागेवर वाहनं उभी करुन रेल्वेने पुढील प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
जरांगे समर्थकांनी रस्त्यावर घातला धिंगाणा
शेकडो जरांगे समर्थकांनी रस्त्यावर नाचत धिंगाणा घातला. वाटेल त्या रस्त्यावर रास्ता रोको करत वाहतुकीची कोंडी केली. पोलिसांनी जरांगे समर्थकांची समजूत काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू केले. काही जरांगे समर्थकांनी मुंबई महापालिकेजवळ सजावटीसाठी म्हणून उभारलेल्या छोट्या कृत्रिम हौदाच्या पाण्यात आंघोळ केली आणि इतरांनाही रस्त्यावरच आंघोळ करण्यास सांगितले. यामुळे महापालिका मुख्यालयाजवळच्या रस्त्याला ओंगळवाणे स्वरुप आले.