
कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. पुलियाकुलम परिसरात असलेले ‘मुंधी विनायक मंदिर’ हे केवळ श्रद्धेचे केंद्र नाही, तर ते शिल्पकलेचा एक अद्भुत नमुना आहे. येथे तब्बल २० फूट उंच आणि १९० टन वजनाची गणेशाची भव्य मूर्ती एकाच दगडातून साकारण्यात आली आहे, जी आशियातील सर्वात मोठ्या गणेशमूर्तींपैकी एक मानली जाते.
या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील गणेशाची भव्य मूर्ती. ‘मुंधी विनायक’ या नावाचा अर्थ ‘प्रथम पूजनीय’ किंवा ‘अग्रगण्य’ असा होतो आणि ही मूर्ती आपल्या नावाला सार्थ ठरवते. ही संपूर्ण मूर्ती एकाच विशाल दगडातून कोरण्यात आली आहे, ज्यामुळे तिचे कलात्मक आणि ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढते. मूर्तीची उंची १९ फूट १० इंच असून, वजन तब्बल १९० टन आहे. या मूर्तीची स्थापना १९८२ साली करण्यात आली. यासाठी लागणारा विशाल दगड इरोडजवळील ऊथुकुली नावाच्या गावातून आणण्यात आला होता. मुंधी विनायक मंदिर हे स्थानिक भाविकांसोबतच देशभरातील पर्यटकांसाठीही एक प्रमुख आकर्षण आहे. मंदिराची रचना साधी असली, तरी प्रवेश करताच समोर दिसणारी गणेशाची भव्य मूर्ती प्रत्येकाला थक्क करते.