
बीड: बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडजवळील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडले. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी आठच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अपघातातील सर्व लोक पेंडगाव येथे दर्शनासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, मात्र त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना चिरडले. धडक इतकी जोरदार होती की, चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी याच महामार्गावर, गढी उड्डाणपुलाजवळ अशाच प्रकारच्या अपघातात पाच ते सहा लोकांचा मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.