मंत्री प्रताप सरनाईक यांनी विरार इमारत दुर्घटनेतील जखमींची हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली भेट
पालघर: विरारमध्ये इमारत कोसळून (Virar Building Collapse) १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. राज्याचे परिवहन मंत्री व पालघर जिल्हा संपर्कमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आज या दुर्घटनास्थळाला भेट दिली आणि पीडित कुटुंबांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. या कठीण काळात आम्ही सर्वजण , राज्य सरकार नागरिकांच्या सोबत उभे आहोत. शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. विरारच्या या दुर्घटनेत ज्यांची घरे गेली आहेत त्यांच्या तात्पुरती राहण्याची सोय बोलींज म्हाडा प्रकल्प येथील घरांमध्ये करण्याबाबत मंत्री सरनाईक यांनी म्हाडाच्या उपाध्यक्षाना सूचना केल्या. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सरनाईक यांनी फोनवरून सविस्तर चर्चा केली. बोलींज म्हाडा प्रकल्पातील ६० घरे लगेच दुर्घटनाग्रस्त नागरिकाना तात्पुरत्या स्वरुपात राहण्यासाठी देण्याचा निर्णय सरनाईक यांनी घेतला. या रहिवाशांना उद्यापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी म्हाडाची घरे दिली जातील , असे सरनाईक यांनी सांगितले. प्रताप सरनाईक यांनी महापालिका मुख्यालयात याबाबत बैठक घेऊन एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वसई विरारमधील धोकादायक , जुन्या इमारतींच्या विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना आणि लागू केला जाईल , असेही उपमुख्य मंत्री शिंदे यांनी व मंत्री सरनाईक यांनी सांगितले. याबाबत पुढील आठवड्यात मंत्रालयात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बैठक घेणार आहेत , अशी माहिती सरनाईक यांनी दिली.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्वप्रथम दुर्घटनेतील जखमींची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यांच्यावरील उपचारा बाबत महापालिकेला सूचना केल्या . त्यानंतर दुर्घटना स्थळाला भेट दिली. महापालिका मुख्यालयात मंत्री प्रताप सरनाईक यांनी आढावा बैठक घेऊन भविष्यात अशा दुर्घटना घडू नये म्हणून काय काय उपाययोजना करता येईल त्याचा आढावा घेतला.
यावेळी मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की , वसई विरार महापालिकेचा स्वतःचे एकही संक्रमण शिबिर नाहीये. अशी एखादी दुर्घटना घडली तर विस्थापित नागरिकांना राहण्यासाठी महापालिकेने घरांची व्यवस्था करण्यासाठी गृह प्रकल्प तयार करावा. म्हाडा सोबत जॉइंट वेंचर करून महापालिकेने आधी स्वतःची घरे उपलब्ध करून घ्यावीत. वसई विरार नालासोपारा मध्ये मोठ्या प्रमाणात धोकादायक अनधिकृत इमारती आहेत. या इमारतींसाठी क्लस्टर योजना व एसआरए योजना लागू करावी, याबाबत महापालिकेने प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठवावा , नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक लवकरच घेतली जाईल , असे सरनाईक यांनी सांगितले.
लोकांना न्याय मिळवून देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
यावेळी मंत्री सरनाईक यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महापालिकेतून फोन लाऊन सर्व माहिती दिली. वसई विरारच्या प्रश्नावर लवकरच मी बैठक घेतो आणि तेथे क्लस्टर डेव्हलपमेंट , एसआरए प्रत्यक्षात लागू करून लोकांना न्याय दिला जाईल असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यापुढे अनधिकृत बांधकामाची एकही वीट नको !
आजवर अनधिकृत बांधकामे करून बिल्डरांनी लोकांची फसवणूक केली. यापुढे वसई विरार मध्ये एकही अनधिकृत बांधकामाची भिंत उभी राहता कामा नये. अनधिकृत बांधकामे आणि दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी केल्या. शहरात यापुढे अनधिकृत बांधकामे होऊ नये यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासन यांनी कठोर भूमिका घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महापालिका प्रशासनाने तातडीने मदतकार्य करावे आणि जखमींवर योग्य उपचार होतील याची काळजी घ्यावी, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित व स्थानिक आमदार राजन नाईक यांनी दुर्घटना घडलेल्या इमारतीमधील २८ कुटुंबांना प्रत्येकी २०/२० हजार तातडीची मदत वैयक्तिक रित्या केली आहे. यावेळी आमदार राजेंद्र गावित , खासदार हेमंत सवरा , आमदार राजन नाईक , पालघर जिल्हाधिकारी , वसई विरार मनपा आयुक्त यांच्यासह सर्व अधिकारी देखील उपस्थित होते.