
टोकियो / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शुक्रवारी (दि.२९) टोकियोमध्ये शोरिंझान दारुमा-जी मंदिराचे मुख्य पुजारी रेव सेइशी हीरोसे यांनी पंतप्रधान मोदींना एक खास भेट म्हणून दारुम डॉल दिली. ही डॉल जपानमधील पारंपरिक बाहुली मानली जाते, जी सौभाग्य आणि यश यांचं प्रतीक आहे. विशेष म्हणजे, या बाहुलीचं भारताशी एक खोल नातं आहे. दारुम डॉल ही गोलसर, खोखली आणि हात-पाय नसलेली एक पारंपरिक जपानी बाहुली आहे. तिचं डिझाईन बोधिधर्म या बौद्ध भिक्षूच्या आधारावर तयार करण्यात आलं आहे. सामान्यतः ही बाहुली लाल रंगाची असते, कारण एशियाई संस्कृतीत लाल रंगाला सौभाग्य, समृद्धी आणि यशाचं प्रतीक मानलं जातं. दारुम डॉलचा संबंध भारतातील बौद्ध भिक्षू बोधिधर्म यांच्याशी आहे. असं मानलं जातं की बोधिधर्म दक्षिण भारतातून चीन आणि जपानमध्ये गेले होते, आणि तिथूनच झेन बौद्ध धर्माच्या परंपरेची सुरुवात झाली. जपानमध्ये त्यांना ‘दारुमा’ असं म्हटलं जातं, आणि त्यावरूनच दारुम डॉल या बाहुलीचं नाव पडलं. म्हणूनच दारुम डॉल ही फक्त जपानी संस्कृतीचा भाग नाही, तर तिचे मूळ थेट भारताच्या बौद्ध धर्माशी जोडलेलं आहे.