Friday, August 29, 2025

Mumbai Traffic : मराठा आंदोलनाचा मुंबई वाहतुकीवर तगडा परिणाम, मुंबईत कुठे कुठे ट्रॅफिक? कोणते पर्यायी मार्ग खुले? हा मार्ग निवडा

Mumbai Traffic : मराठा आंदोलनाचा मुंबई वाहतुकीवर तगडा परिणाम, मुंबईत कुठे कुठे ट्रॅफिक? कोणते पर्यायी मार्ग खुले? हा मार्ग निवडा
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मोठं आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आंदोलनामुळे संपूर्ण शहरात वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, मुंबईतील अनेक ठिकाणी गाड्यांच्या लांबलचक रांगा दिसत आहेत. ईस्टर्न फ्रीवेवर मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे, तर काही रस्त्यांवर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्र आहे. एवढंच नव्हे तर या आंदोलनाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही जाणवू लागला असून, मध्य रेल्वेची गती मंदावल्याचे स्पष्ट होत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठ्या वाहतूक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सीएसटीएम-चर्चगेट ठासून भरले

शहरात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. मात्र, याचवेळी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असून, त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. रस्ते ठप्प झाल्याने आंदोलकांनी लोकल ट्रेनचा पर्याय स्वीकारल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे सीएसटीएम (CST) आणि चर्चगेट स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. सीएसटीएमवरून कल्याण आणि पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या अक्षरशः तुडुंब भरून सुटताना दिसत आहेत. वाढलेल्या गर्दीचा परिणाम मध्य रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही झाला असून, सुमारे १० मिनिटांचा विलंब होत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ईस्टर्न फ्री वे ठप्प

मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका आता शहरातील प्रमुख रस्त्यांनाही बसला आहे. आंदोलकांच्या मोठ्या संख्येने गाड्या मुंबईतील ईस्टर्न फ्री वेवर दाखल झाल्याने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहतूक पोलिसांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. मानखुर्द परिसरातही परिस्थिती गंभीर झाली असून, सायन–पनवेल हायवेवर वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पावसाचा जोर आणि आंदोलकांचा मोठा ओघ या दोन्हींचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना तासन्तास ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागत आहे.

मुंबईत रस्ते ब्लॉक; आंदोलनामुळे वाहतूक ठप्प

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी छेडलेल्या आंदोलनाचा थेट परिणाम आता मुंबईच्या रस्त्यांवर दिसून येत आहे. दक्षिण मुंबईकडे जाणारे अनेक प्रमुख रस्ते पूर्णपणे ब्लॉक झाले असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गुगल मॅप्सवरही याचे स्पष्ट चित्र दिसत असून अनेक रस्ते लाल रंगाने चिन्हांकित झाले आहेत. मराठवाडा, नाशिकसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने आंदोलक आझाद मैदानाकडे दाखल झाले आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईच्या वाहतुकीवर प्रचंड ताण पडला असून प्रवास वेळेत दुप्पट वाढ झाल्याचे चित्र आहे.

वाशीहून पांजरपोळ फ्रीवे मार्ग बंद

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांवर निर्बंध लागू करण्यात आले असून वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाशीहून साऊथ बाऊंड पांजरपोळ फ्रीवेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. यासोबतच वीर जिजाबाई भोसले मार्गावरून ट्रॉम्बेकडे जाणाऱ्या वाहने, तसेच छेडानगरवरून फ्रीवेकडे जाणारी वाहने यांनाही बंदी घालण्यात आली आहे. या सर्व मार्गांवरील वाहतूक वळवून पर्यायी रस्ते दाखवले असून, नागरिकांनी संयम बाळगावा असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

गाड्यांऐवजी ट्रेनचा वापर करा पोलिसांचे आवाहन

मराठा आरक्षण आंदोलनामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सायन–पनवेल हायवेवर मराठा आंदोलकांच्या वाहनांना अडवण्यास सुरुवात केली आहे. बाहेरून आलेल्या गाड्यांना वाशी रेल्वे स्थानकाबाहेर पार्क करून रेल्वेने मुंबईत प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की, अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी लोकल ट्रेनचा पर्याय स्वीकारावा. तसेच मोठ्या वाहनांना शहराच्या आत प्रवेश न देता उपनगरी भागातच थांबवले जात आहे. आंदोलकांच्या प्रचंड संख्येमुळे रस्त्यावरील ताण वाढला असून, रेल्वे प्रवास हा तुलनेने सुरक्षित आणि सोयीस्कर ठरणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
Comments
Add Comment