मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आज अखेर मुंबईत दाखल झाले असून, त्यांनी आझाद मैदानावर ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. परिणामी, शहरातील अनेक भागात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सरकारने आंदोलनाला परवानगी दिल्याबद्दल मनोज जरांगे यांनी आभार मानले, मात्र याचवेळी त्यांनी मोठा इशाराही दिला. “आम्हाला फक्त एक दिवस नाही, तर बेमुदत उपोषणाची परवानगी द्या,” अशी थेट मागणी करून त्यांनी सरकारसमोर ठाम भूमिका मांडली. या उपोषणामुळे पुढील काही दिवसांत मुंबईत आंदोलनाचे व राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत दाखल झालेले मनोज जरांगे पाटील यांना प्रशासनाने फक्त एकाच दिवसाची उपोषणाची परवानगी दिली आहे. न्यायालयाने यापूर्वी त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र, पोलिसांनी २० अटींच्या अधीन राहून उपोषण करण्याची मुभा दिली आहे. तरीदेखील जरांगे पाटील यांनी आपली ठाम भूमिका कायम ठेवत स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आमच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही, हा माझा शब्द आहे.” प्रशासनाने दिलेली परवानगी फक्त आजपुरतीच मर्यादित असल्याने, पुढील काळात आंदोलनाचं रूप काय घेईल आणि जरांगे पाटील कोणती भूमिका घेतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मोहित सोमण:आरबीआयचे माजी गव्हर्नर डॉ उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणे निधी (International Monetary Fund) या जागतिक दर्जाच्या संस्थेच्या कार्यकारी संचालक पदावर ...
मुंबईत मराठा समाजाची गर्दी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मोठ्या संख्येने मराठा बांधव दाखल झाले आहेत. समाजाच्या या उपस्थितीमुळे सकाळपासूनच मुंबईतील अनेक भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली. काही आंदोलकांनी आपली वाहने रस्त्यावरच उभी केल्याने ही कोंडी अधिक वाढल्याचे दिसून आले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना थेट आवाहन केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आपली वाहने लगेच बाजूला काढा आणि मुंबईचे रस्ते रिकामे करा. पोलिसांकडून पार्किंगची माहिती घ्या आणि त्यांना पूर्ण सहकार्य करा.” जरांगेंच्या या सूचनेनंतर आंदोलनाला आलेल्या बांधवांनी शिस्त राखत पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक असल्याचेही अधोरेखित झाले आहे.
मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका दिवसेंदिवस अधिक ठाम होताना दिसत आहे. आझाद मैदानावर जमलेल्या मराठा बांधवांना त्यांनी थेट संदेश दिला की, “गोंधळ, धिंगाना अजिबात घालायचा नाही. शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन सुरू ठेवा.” जरांगे पाटील हे अजूनही बेमुदत उपोषण करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम असून, सरकारकडून परवानगी मिळावी, यासाठी त्यांनी स्पष्टपणे आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारचे शिष्टमंडळ त्यांच्या भेटीस गेले होते; मात्र या चर्चेतून कोणताही ठोस पर्याय समोर आला नाही. सरकारकडून विविध प्रयत्न झाले तरी जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. “आता काहीही झाले तरी आम्ही मागे हटणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांच्या या निर्धारामुळे आंदोलनाची तीव्रता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.