Saturday, August 30, 2025

मुंबईत ४ सप्टेंबरपर्यंत आंदोलन करण्याचे जरांगेंचे संकेत!

मुंबईत ४ सप्टेंबरपर्यंत आंदोलन करण्याचे जरांगेंचे संकेत!

आंदोलनासाठी एक दिवसाच्या मुदतवाढीनंतर जरांगेची प्रतिक्रिया

मुंबई:  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी मराठा आरक्षणासाठी आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु केले आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. या आंदोलनासाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईतील आझाद मैदानावर आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, मुंबई पोलिसांनी त्यांना मर्यादित कार्यकर्त्यांसह केवळ एका दिवसासाठी आंदोलनाची परवानगी दिली होती,  मात्र त्यानंतर पुढे काय? असा प्रश्न पडला होता. त्यानंतर, आता जरांगे यांना उद्या (दि. २९ ऑगस्ट) देखील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पण त्यासोबत काही नियम आणि अटी देखील लादण्यात आल्या आहेत. या संदर्भात जरांगे पाटील यांनी प्रसारमध्यमानशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

काय म्हंटले जरांगे?

सरकारने आता कसलेही डाव खेळू नये, आरक्षण द्यावे. आम्हा गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले, तर आम्ही तुम्हाला विसरणार नाही. तुम्ही एक एक दिवस मुदतवाढ दिली तरी उपोषण मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरू राहील. आता हे सिद्ध झालंय की सरकार परवानगी देऊ शकते. मला गोळी मारण्याचे, लोक अडवायचे सगळे सरकारच्या हातात आहे, असे मराठा आरक्षण मागणीसाठी आग्रह नेते मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. शिवाय मुंबईत ४  सप्टेंबरपर्यंत आंदोलन करण्याचे संकेतही या निमित्ताने त्यांनी दिले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासह अन्य संलग्न मागण्यांसाठी जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. त्या निमित्ताने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे पुढे म्हणाले की, आंदोलनाचे एकूण आठ टप्पे असून आता आंदोलनाचा पहिला टप्पाच सुरू झाला आहे. यापुढे बुधवारी आणि गुरुवारी आणखी मराठा आंदोलक मुंबईत येणार आहेत. इंग्रजांपेक्षा ही सरकार बेकार आहे. सरकारने भंगार खेळ खेळणे बंद करावे आणि खरा खेळ खेळावा. जेवण आणि पाणी मिळू दिले नाही. एका दिवसाची रडक्यासारखी परवानगी देऊन आम्हाला त्रास देऊ नये. तुम्ही आमच्या जिल्ह्यात आल्यावर अशी वागणूक देतो का? आम्ही मराठे आडमुठे घुसणार. मराठा समाजाच्या पोरांशी वाईट वागू नये. आपले खरे आणि आमचे खरे वेगळे असे कसे होऊ शकते? आमच्या पोरांचे खूप हाल आहेत, तुम्हाला ते कळणार नाही. मराठ्यांनी शांततेचा मार्ग धरला असून, कोणताही गैरप्रकार करणार नाहीत. मात्र, सरकारने जर काही अडथळे आणले तर मोठ्या संख्येने मराठे मुंबईत येणार आहेत. सरकारच्या धोरणावर टीका करत पुढे म्हणाले, सरकारला मराठ्यांच्या पोरांचे भले होऊ द्यायचे नाही. एकाचे काढून दुसऱ्याला मागतच नाही, हीच त्यांची पद्धत आहे. आमच्या जुन्या नोंदी आहेत, आरक्षण मागत आहोत आणि आता फायनल फाईट होणार आहे. ओबीसी १६ टक्के आरक्षणातले २० टक्के कापून मराठा समाजाला द्यावे, असे सरकारकडे मागणी केली जात आहे. जरांगे यांनी आंदोलनाच्या परवानगीबाबतही मत व्यक्त केले. ते म्हणाले, मराठा समाजाचे मन जिंकण्याची हीच योग्य वेळ आहे. गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण दिले तर मराठा समाज या सरकारला विसरणार नाही. दुकानं बंद करणे, पाणी मिळू न देणे अशा प्रकारांनी मराठ्यांना मुंबईतून कंटाळवून पाठवण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण हे चालणार नाही. त्यांनी सरकारला सूचित केले की, मराठा समाजाची मुले माज घेऊन आलेली नाहीत, ते वेदना घेऊन आले आहेत. मी उपोषण करून आरक्षण मिळवेन, हरकत नाही. पण मराठा समाजाच्या मुलांसाठी दुकाने बंद ठेवू नका, अन्यथा आम्ही देखील पाणी आणि दुकाने बंद करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे यांचा हा निर्णय महाराष्ट्रातील आरक्षणाच्या चर्चेत महत्त्वपूर्ण ठरतो. मराठा समाजाच्या भवितव्यासाठी हे आंदोलन ठाम राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे आणि सरकारने त्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा