Friday, August 29, 2025

हिमाचल प्रदेश : चंबा येथे दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेश : चंबा येथे दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू

शिमला : हिमाचल प्रदेशातील चंबा आणि भरमौर परिसरात जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. भरमौर परिसर संपूर्णपणे बाहेरच्या जगापासून तुटून गेला आहे. अनेक ठिकाणी रस्ते कोसळले असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. दूरसंचार सेवा सुद्धा अनेक भागांत अजूनही सुरू झालेल्या नाहीत. मणिमहेश यात्रेत सहभागी हजारो भाविक अडकले आहेत.

गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक लोकांनी आपली वाहने रस्त्यावरच सोडून पायपीट सुरू केली आहे. चंबा जिल्ह्यातील भरमौर भागात प्रसिद्ध मणिमहेश यात्रा सुरू आहे. गेल्या 4 दिवसांपासून मोबाईल नेटवर्क पूर्णपणे बंद असल्याने यात्रेकरूंचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क तुटला होता, ज्यामुळे चिंता वाढली होती. भूस्खलन आणि रस्ते बंद असल्याने अनेक यात्रेकरू भरमौरमध्ये अडकले आहेत. चंबा जिल्ह्यात आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती पाहता मणिमहेश यात्रेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

मणिमहेशमधून सुमारे 3 हजार लोक सुखरूप परतले आहेत, पण अजूनही सुमारे 7 हजार भाविक तिथे अडकलेले आहेत. त्यांच्या मदतीसाठी प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत. ही यात्रा दरवर्षी जन्माष्टमीपासून राधाष्टमीपर्यंत आयोजित केली जाते. यंदा जन्माष्टमी 16 ऑगस्टला होती तर राधाष्टमी 31 ऑगस्टला आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेशातल्या या मुसळधार पावसामुळे राज्यभरात जनजीवन ठप्प झाले आहे. राज्यातील 2राष्ट्रीय महामार्गांसह एकूण 795 रस्ते बंद आहेत. तसेच 5 जिल्ह्यांतील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.ब्यांस नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. हवामान विभागाने चंबा, कांगडा आणि मंडी जिल्ह्यांसाठी 2 दिवसांचा रेड अलर्ट जारी केला आहे.भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले आहे, तसेच चंबा जिल्ह्यात 5 घरे कोसळली आहेत.

Comments
Add Comment