
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया! अशा जयघोषांनी प्रत्येक घराघरात आणि रस्त्यावर वातावरण दुमदुमून जातं. भक्तांच्या हृदयात अपार श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या या गणरायाची असंख्य नावं आहेत... गणाधिपती, गजानन, विघ्नहर्ता, लंबोदर, सिद्धिविनायक अशी कितीतरी. पण या सगळ्या नावांपेक्षा एक नाव सर्वाधिक जिव्हाळ्याचं आहे आणि ते म्हणजे ‘बाप्पा’. गणांचा अधिपती असूनही गणेशाला ‘बाप्पा’ म्हणूनच बहुतेक भाविक संबोधतात. खरं तर ‘बाप्पा’ या नावामागे एक वेगळीच रंजक कथा आहे. संस्कृतमधील ‘पितामह’ किंवा ‘बाप’ या शब्दांपासून ‘बाप्पा’ हा शब्द प्रचलित झाला. यात केवळ देवतेप्रती श्रद्धा नाही, तर घरच्या लेकरासारखा आपुलकीचा भावही दडलेला आहे. म्हणूनच गणपती हा फक्त देव न राहता कुटुंबातील लाडका सदस्य वाटतो. म्हणजेच, गणपतीला ‘बाप्पा’ म्हणून हाक मारताना भक्त केवळ पूजा करत नाहीत, तर आपल्या मनातील आपुलकी, लाड आणि प्रेम व्यक्त करतात.

मुंबई: हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी गणपतीला समर्पित असते. यापैकी, ...
गणपतीला ‘बाप्पा’ म्हणून संबोधलं जातं, यामागे एक खास गोष्ट दडलेली आहे. याबाबत ‘किस्सोंकी दुनिया’ या इन्स्टाग्राम पेजवरून ओमकार सावंत यांनी रंजक माहिती दिली आहे. खरंतर गणपतीची कितीतरी नावं असली, तरी ‘बाप्पा’ म्हणण्यामागे एक वेगळं कारण आहे. गणांचा अधिपती म्हणजे गणपती म्हणूनच त्याला देवतांमध्ये अग्रस्थान दिलं जातं. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेशपूजनाशिवाय होत नाही. पण ‘बाप्पा’ हे नाव तसं मराठी नसलं, तरीही ते सर्वत्र प्रचलित झालं. प्राकृत भाषेत ‘बाप्पा’ हा शब्द वापरला गेला असून त्याचा अर्थ ‘बाप’ किंवा ‘पिता’ असा होतो. म्हणूनच गणपतीला देव म्हणून नव्हे, तर घरच्या लेकरासारखा जिव्हाळ्याने ‘बाप्पा’ म्हणून संबोधलं जातं.
जसं वडील आपल्या लेकरांचं पालनपोषण करतात, त्यांना संकटात साथ देतात आणि प्रत्येक कठीण परिस्थितीत आधार बनून उभे राहतात, तसंच गणपतीदेखील आपल्या भक्तांचं रक्षण करतो. भक्तांच्या आयुष्यातील अडथळे दूर करून, त्यांना सुख-शांती आणि समृद्धी देणारा असा तो खरा बापासारखा आधार आहे. म्हणूनच गणेशभक्त आपल्या गणरायाला फक्त देव म्हणून नव्हे, तर बापाप्रमाणे मानतात. जसा वडिलांप्रती आदर, प्रेम आणि अढळ विश्वास असतो, तसाच भाव भक्तांच्या मनात गणपतीबाबत दिसून येतो. श्रद्धा, प्रेम आणि जिव्हाळ्याने गणपतीला ‘बाप्पा’ म्हणून हाक मारली जाते. विशेष म्हणजे, १८ व्या शतकानंतर ‘बाप्पा’ या शब्दाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. काळाच्या ओघात हा शब्द केवळ नावापुरता न राहता भक्तीभावाचा प्रतीक बनला. आज गणेशोत्सवात प्रत्येक गल्ली-बोळात घुमणारा “गणपती बाप्पा मोरया” चा जयघोष हाच त्या श्रद्धेचा आणि प्रेमाचा जिवंत पुरावा आहे.