
परदेशी नागरिक असल्याच्या संशयावरून बाजवली नोटीस
पाटणा : बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या (एसआयआर) दरम्यान सुमारे 3 लाख मतदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या नागरिकांची नागरिकता "संशयास्पद" असल्याचा संशय आहे.
बिहारमध्ये बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि अफगाणिस्तान येथून आलेल्या संशयित मतदारांना बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये, विशेषतः आंतरराष्ट्रीय सीमा लागून असलेल्या भागांतील निर्वाचन नोंदणी अधिकाऱ्यांकडून (ईआरओ) या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या मदतारांच्या दस्तावेजांची पडताळणी करताना काही विसंगती आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
या संशयित मतदारांची नावे 1 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या मसुदा मतदार यादीत प्रकाशित करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, जर हे मतदार भारतीय नागरिक असल्याचे योग्य कागदपत्र सादर करण्यात अयशस्वी झाले, तर त्यांची नावे 30 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीतून वगळली जातील.
निवडणूक आयोग या प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई करण्याचा विचार सुद्धा करत आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिहारमधील 3 लाख लोकांची नागरिकता संशयास्पद आहे. अशा लोकांना नोटीस बजावण्यात आली आहे. या मतदारांपैकी बरेच जण बांगलादेश आणि नेपाळ येथील असल्याचा संशय आहे. तर काहीजण म्यानमार आणि अफगाणिस्तान येथील असल्याचीही माहिती आहे. जिल्ह्यांमध्ये बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) यांनी केलेल्या क्षेत्र भेटीदरम्यान ही माहिती समोर आली, आणि त्यानंतर संबंधित ईआरओने नोटिसा जारी केल्या.
दस्तऐवज पडताळणीदरम्यान अनेक विसंगती आढळल्या, आणि त्यानंतर क्षेत्रीय चौकशी करून नोटिसा पाठवण्यात आल्या. पूर्वी चंपारण, पश्चिमी चंपारण, मधुबनी, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, अररिया आणि सुपौल हे जिल्हे अशा प्रकरणांसाठी विशेष लक्षात आले आहेत. ज्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, त्यांच्याकडून आवश्यक दस्तावेज सादर करण्यास सांगण्यात आले आहे. जर त्यांनी योग्य कागदपत्र सादर केली, तर त्यांची नावे मतदार यादीतून काढली जाणार नाहीत.
पण जर कोणी आवश्यक दस्तावेज सादर करण्यात अपयशी ठरले, तर त्यांची नावे मसुदा मतदार यादीतून वगळली जातील आणि त्यांच्याविरुद्ध कारवाईही होऊ शकते. यानंतर आयोगाचे अधिकारी जिल्हा प्रशासनाला अहवाल देतील की हे मतदार गैर-भारतीय नागरिक असल्याचे आढळून आले आहेत.