
- डॉ . अभयकुमार दांडगे
मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी आवाहन केले आहे. आता २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेरच आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांना धमकीवजा इशारा देताना त्यांच्या आईचा उल्लेख करत जरांगेंनी काही शब्दांचा वापर केला. जरांगेंच्या या वक्तव्यावरुन वादाला तोंड फुटले आहे. हे शब्द अपशब्द असल्याचे खुद्द मराठवाड्यातूनच बोलले जात आहे.
परस्त्रीला मातेचा दर्जा द्या, अशी शिकवण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिली होती. त्या शिकवणीचे जो पालन करणार नाही, तो छत्रपती शिवरायांच्या मार्गक्रमणावर चालणाराच नसतो. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण नितांत गरजेची आहे. त्यामुळे त्यांच्या शिकवणीचे अनुकरण प्रत्येकाने केले पाहिजे, असा सूर मराठवाड्यातून उमटत आहे. तसेच मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल बोललेले अपशब्द खरोखरच निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया खुद्द मराठा समाजातूनच व्यक्त होत आहे. याबरोबरच 'मुंबईला चला' अशी घोषणा करताना सरकार उलथवून टाकू, अशी भाषा वापरून मनोज जरांगे यांनी राजकीय नेतृत्वाला डिवचले आहे.
महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी कशाप्रकारे यू-टर्न घेतला हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. त्यामुळे आंदोलनाची भाषा करणाऱ्या मनोज जरांगे यांना मराठवाड्यातून खरोखरच पाठिंबा मिळत आहे का? हा एक संशोधनाचा विषय होऊन बसला आहे. शरद पवार यांचे उभे आयुष्य राजकारणात गेले. त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलेले नाही. १९९४ मध्ये ओबीसी आरक्षणाबाबत शरद पवार यांनी घेतलेला निर्णय मराठा समाजाला लाभदायक नव्हता. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास पाहिला तर सर्वाधिक काळ मराठा समाजाच्या हातात सत्ता होती. मराठवाड्यातून विलासराव देशमुख तसेच अशोकराव चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यांनी मराठा समाजाला कितपत न्याय दिला याचे अवलोकन मनोज जरांगे यांनीच करावे, अशीही प्रतिक्रिया ओबीसी समाजामधून उमटत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांना शरद पवार यांच्याकरवी पुढे केले जात आहे, असे मराठवाड्यात बोलले जात आहे. मनोज जरांगे यांना त्यांच्याकडून रसद पुरवठा होत आहे की काय? अशी शंका घेण्याइतपत मराठवाड्यात चर्चा होत आहे.
राज्यात तसेच देशभरात मराठा समाजाचे अनेक सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत. तसेच अनेक दिग्गज वकील मंडळीदेखील मराठा समाजातूनच आहेत. मराठा आरक्षणाविषयी कायदेशीर असलेली गुंतागुंत किंवा यामधून कसा कायदेशीर मार्ग काढता येईल याबाबत मनोज जरांगे यांनी चर्चा करून त्याविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी किंवा कायदेशीर मुद्द्यांवर हा लढा लढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायद्याच्या चौकटीत बसतील असे नियम व निर्णय घेत आहेत. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री फडणवीस हे कुठे चुकत असतील तर त्यावर कायदेशीर लढाई करावी किंवा तसे मुद्दे समोर आणावेत जेणेकरून मराठा समाजातील संपूर्ण नेते तसेच संपूर्ण समाज मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभा राहील. भारतीय संविधानाला अनुसरून किंवा कायद्याच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण कशा पद्धतीने आणता येईल हे देखील मनोज जरांगे यांनी पुराव्यानिशी सरकारकडे सादर केल्यास ओबीसी समाज कदाचित त्यांना त्याबाबत विरोधही करणार नाही,अशी मराठवाड्यातील ओबीसी समाजाची भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठेतर असल्यामुळे त्यांच्यामागे वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून त्रास देण्याचे राजकारण मराठवाड्यातूनच पेटत आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. 'गोरगरीब समाज बांधव' या गोंडस नावाखाली मनोज जरांगे हे मराठा समाजातील नागरिकांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळेच मराठवाड्यात ग्रामीण भागात मराठा विरुद्ध ओबीसी असे गढूळ वातावरण निर्माण होत आहे.
मराठवाड्यातील जालना व बीड जिल्ह्यातून या आंदोलनाची धग सुरू झाली. बीड जिल्ह्यातील गेवराई येथे सोमवारी प्रचंड राडा झाला. त्यामुळे राजकीय वातावरण तापले. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्यासह दोन्ही गटातील १४ जणांवर गेवराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्या राड्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मराठवाड्यात पोलीस यंत्रणा सतर्क आहे. शिवनेरीवर छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन मराठा मोर्चाला प्रारंभ करण्यात येईल, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केल्यानंतर मराठा समाजातील अनेक कार्यकर्ते उत्साहित झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या कार्यकाळात मराठा समाजासाठी अधिसंख्य पदे निर्माण केली.
आजवर ३५५३ अधिसंख्यपदे भरण्यात आली. याबरोबरच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. तसेच राजश्री छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनाही सुरू करण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले.
सारथी राष्ट्रीय अधि छात्रवृति योजना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हातभार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर बोलू नका, असे स्पष्ट आदेश शिवसेनेच्या मंत्र्यांना दिले आहेत. मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले जात असताना एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाजात चलबिचल अवस्था आहे. सध्या गणेशोत्सवची धामधूम सुरू आहे. मुंबईत तर गणेशोत्सवानिमित्त प्रचंड गर्दी आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, परिणय फुके तसेच आ. चित्रा वाघ यांनी देखील जरांगे यांच्या अपशब्दांवर कडाडून टीका केली. या टीकेनंतरही मनोज जरांगे हे आंदोलनावर ठाम आहेत. एकंदरीत गणेशोत्सव काळात मनोज जरांगे यांचे हे आंदोलन निर्विघ्न पार पडेल की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.