
झुरिच: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे झालेल्या डायमंड लीग २०२५ च्या अंतिम फेरीत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. जर्मनीच्या ज्यूलियन वेबरने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
वेबरने सुरुवातीपासूनच आपली पकड मजबूत केली. त्याने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ९१.५१ मीटरचा शानदार थ्रो करत सर्वोत्तम कामगिरी केली, जो या हंगामातील सर्वात लांब थ्रो ठरला.
त्या तुलनेत नीरज चोप्राला स्पर्धेच्या सुरुवातीला चांगली लय मिळाली नाही. त्याचा पहिला थ्रो ८४.३५ मीटरचा होता आणि त्यानंतरचे त्याचे तीन थ्रो फाऊल झाले. त्याच्या दुसऱ्या थ्रोमध्येही त्याला केवळ ८२ मीटरपर्यंतच भालाफेक करता आली. नीरजसाठी हा दिवस खास नव्हता. पण त्याने आपल्या शेवटच्या प्रयत्नात ८५.०१ मीटरचा थ्रो करत दुसरे स्थान मिळवले.
या विजयासह ज्यूलियन वेबरने आपले पहिले डायमंड लीग विजेतेपद जिंकले. नीरज चोप्रासाठी हा सलग तिसऱ्यांदा डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानावर राहण्याचा अनुभव होता. त्याने २०२२ मध्ये विजेतेपद जिंकले होते, परंतु त्यानंतर २०२३ आणि २०२४ मध्ये त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेनंतर नीरज चोप्रा म्हणाला की, त्याला आणखी चांगला थ्रो करायचा होता, पण आगामी टोकियो येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी तो तयारी करत राहील. त्याने ज्यूलियन वेबरचे अभिनंदन केले आणि त्याच्या दमदार कामगिरीचे कौतुक केले.