पर्यटनस्थळावरील उपकर म्हणजे शाश्वत पर्यटनात सहभाग

  19

- मधुसूदन जोशी

पर्यटन हे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एक आवश्यक साधन आहे. पर्यटनावर कितीतरी व्यवसाय, व्यक्ती अवलंबून असतात. पण आताच्या काळात पर्यटन थोडे महाग वाटू लागते ते केवळ महागाई वाढल्याने नाही, तर पर्यटनावर लावल्या गेलेल्या करामुळे. आपण पर्यटनासाठी विविध हॉटेल्स वापरतो, प्रवासासाठी गाडी किंवा क्रूझ वापरतो, अभयारण्यात जातो. प्रत्येक ठिकाणची जैवविविधता जपण्यासाठी आणि वातावरणातील बदलात सुसूत्रता राखण्यासाठी काही विशिष्ठ वाढीव रक्कम कराच्या रूपात द्यावी लागते आणि आता ते अपरिहार्य झालंय.

२०२३ च्या ऑगस्ट महिन्यात हवाई बेटांवर शुष्क जंगलांना आगीने वेढले, त्यात महाभयंकर वादळी वाऱ्याने त्या आगीला रौद्र रूप दिले. परिणामस्वरूप १०२ जणांनी प्राण गमावले, तर सुमारे २००० इमारतींचे नुकसान झाले. वातावरण बदलाचा परिणाम ठरलेले आणि प्रलयकारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले ते अमेरिकेतील एक ठिकाण ठरले. या वर्षी मे महिन्यात ‘हवाई’च्या प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण पण दूरगामी निर्णय घेतला. ग्रीन टॅक्स या नावाने ओळखला जाणारा हा कर, पर्यटकांकडून ०.७५% इतका वसूल करण्यास सुरुवात केली. अर्थातच याचा परिणाम म्हणून हॉटेलचे टॅरिफ, रेस्टॉरंट मधील खाद्यपदार्थ यांचे दर, यांच्यात वाढ झाली. यामागील भूमिका विशद करताना तिथल्या गव्हर्नरने म्हटले की यामुळे २०२६ पासून होणाऱ्या पुनर्वसनाच्या निमित्ताने आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या इमारती वगैरेंचे नुकसान अंशतः भरून निघेल आणि यामुळे साधारण १०० दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम जमा होईल. हवाई चे गव्हर्नर जनरल जोश ग्रीन एका पत्रकार परिषदेत म्हणाले की वार्षिक १० दशलक्ष पर्यटक या बेटांना भेट देतात यावेळी वातावरणीय संकटांचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल ठरेल.

सुसान फाझेकास तेथील "अवापूही अडव्हेंचर्स क्लब"चा मालक आणि गिर्यारोहण आयोजक. त्याच्या मते येणाऱ्या पर्यटकांकडून उपकर घेणे हे पर्यटकांवर ओझे नाही तर तेथील निसर्गसौंदर्य, धबधबे आणि इतर सौंदर्यस्थळे यांचे संवर्धन करण्यासाठी दिलेले एक सह-उत्तरदायित्व आहे. या करामुळे संवर्धनाचा भार केवळ स्थानिक प्रशासनावर पडत नाही. जानेवारी २०२४ मध्ये ग्रीसच्या प्रशासनाने एके दिवशी तिथे रात्री राहण्याच्या प्रवासी करात ०. ५० युरो ते १० युरो इतकी वाढ केली. तेथील प्रसिद्ध मेकॅनोस किंवा सँटोरिनी बेटांवर अति गर्दीच्या काळात हे पाहायला मिळते. या उपकारातून तेथील प्रशाशन ४०० दशलक्ष युरोची जमा रक्कम अपेक्षित करते. त्यातून पाण्याचे व्यवस्थापन, आपत्तींना प्रतिबंध जैवविविधतेचे संवर्धन याचा खर्च निघू शकतो. बाली, मालदीव बेटांवर २०१५ सालापासून प्रत्येक रात्रीच्या निवासासाठी विशिष्ट उपकर आकारला जायचा जो २०२५ पासून वाढवण्यात आला आहे, न्यूझीलंडने २०१९ साली प्रथम आंतरराष्ट्रीय पर्यटकांकडून उपकराच्या वसुलीला सुरवात केली जी २०२४ मध्ये तिथल्या चलनात म्हणजे न्यूझीलंड डॉलर मध्ये १०० डॉलर इतकी आहे. या कराचा उपयोग पर्यावरण संवर्धन, प्रवाशांच्या सोयी आणि देशातील पर्यटनाच्या शाश्वत व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी होतो.

वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिलचे संशोधन आणि शाश्वतता या विषयावरील उपाध्यक्ष ख्रिस्तोफर इम्बसें म्हणतात की असे उपकर हे पर्यटकांना बंधन नसून आपल्या पर्यटनाच्या दरम्यान केलेल्या मौजमजेच्या निमित्ताने त्या त्या ठिकाणच्या पर्यावरण संवर्धनासाठी लावलेला हातभार वाटतात. बुकिंग डॉट कॉम ने २०२४ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार ७५% जागतिक पर्यटक असे उपकर देण्यास आनंदाने तयार असतात. त्यांना भेट दिलेल्या ठिकाणांची परिस्थिती चांगल्या प्रकारे बदलण्यासाठी योगदान देण्यात आनंद वाटतो. युरोमॉनिटर ने २०२३ साली केलेल्या एका सर्वेक्षणात जागतिक पर्यटक १०% इतका उपकर देण्यास राजी असतात ज्यात शाश्वत पर्यटनाची हमी असते.
महो तनाका या जपानी जाहिरातदार व्यवसायिकेच्या म्हणण्यानुसार हवाई बेटांना भेट देण्यासाठी द्यावा लागणार अतिरिक्त उपकर ०.७५% इतका असेल तर पर्यटकांच्या आवाक्यात असेल. पर्यटकांना देखील हवाई बेटांवरील जंगल आणि समुद्रकिनारे यांच्या संवर्धनाच्या सामाजिक उपक्रमाचा भाग होणे आवडते.

यापुढच्या काळात पर्यावरणाची जितकी आव्हाने पर्यटनाच्या दृष्टीने येतील त्यांना सामोरे जाण्यासाठी स्थानिक प्रशासनाला उपकराच्या रूपाने आपण अंशदान द्यायला हवे. सरकार सगळे पाहील ही वृत्ती न ठेवता आपले ते एक जागतिक कर्तव्य आहे. आपण एक जबाबदार नागरिक या दृष्टीने जगात पर्यटन करताना या नैसर्गिक उपद्रवांचे भान ठेऊन त्यावर मात करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करायला हवेत. फक्त या वसुलीत पारदर्शकता हवी.

या अानुषंगाने मालदीवचे प्रशासन मासिक ग्रीन टॅक्स रिपोर्ट प्रकाशित करते. या उपकराचा विनियोग, पाण्यावरील प्रक्रिया, जलमार्ग यांच्यासाठी कसा करण्यात आला हे प्रकाशित करते. अशाच पद्धतीचा अहवाल न्यूझीलंड चे प्रशासन दरवर्षी प्रकाशित करते ज्यात कोणत्या प्रकल्पांवर किती खर्च करण्यात आला, तिथे प्रचलित असलेल्या सायकल ट्रेल मार्गाच्या संवर्धनासाठी किती निधी वापरला गेला इत्यादींचे तपशील असतात. हवाई बेटांनी याबाबत एक ६० पानी अहवाल प्रकाशित केला ज्यात दुर्दैवी आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या वास्तूंचे पुनर्स्थापन कशाप्रकारे केले याचा तपशील प्रसिद्ध केला. या सर्व लेखाचा मतितार्थ इतकाच आहे की पर्यटनाच्या निमित्ताने आपल्याकडून नकळत पर्यावरणाची हानी होते. एक प्रकारे हे पातकच. हा कर देणे म्हणजे या पातकाची भरपाई त्याला पर्यटकांनी तयार असावे.
Comments
Add Comment

फूड प्रोसेसिंग-तंत्र, कौशल्य आणि व्यवस्थापन

सुरेश वांदिले मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांमुळे फूड प्रोसेसिंग(अन्नप्रकिया)उद्योग

जरांगेंच्या भाषेबाबत मराठवाड्यात नाराजी

- डॉ . अभयकुमार दांडगे  मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी

भाजपने केला विजयाचा फार्म्युला सेट

पुणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, महापालिकेच्या निवडणुका या दिवाळीनंतर होणार असल्याचे सांगितले जात

महापुराचे संकट तूर्तास टळले, नुकसान अटळ!

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्हे कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नद्यांच्या खोऱ्यात वसलेले

येवा कोकण तुमचाच आसा...!

वार्तापत्र : कोकण कोकणामध्ये गणेशोत्सव, शिमगोत्सव हे सण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उत्साहाने

सूर्यावर वादळवारे होतात का?

कथा : प्रा. देवबा पाटील सूर्यावर हायड्रोजन व हेलियममध्ये सतत रासायनिक प्रक्रिया होत असल्यामुळे त्या