Saturday, August 30, 2025

Ajit Pawar Onion Issue: अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न, 'कांदा' प्रश्नावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

Ajit Pawar Onion Issue: अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न, 'कांदा' प्रश्नावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

अहिल्यानगर: आज श्रीगोंदा (ahilyanagar) येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit pawar) दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न झाला. याप्रसंगी, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून ते संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे तत्कालीन युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्याकडून लातूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या समर्थकांनी असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज आहे.

श्रीगोंदा येथे शेतकरी मेळाव्यात अजित पवारांचे भाषण सुरू असताना संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते हातात कांद्याची माळ घेऊन आले होते. त्यावेळी, एका कार्यकर्त्याने हातातील माळ गरागरा फिरवत अजित पवारांकडे फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच तेथील एकाने त्याला रोखले.  या प्रकारानंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि तालुका अध्यक्ष नाना शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

संभाजी ब्रिगेडच्या समर्थकांकडून कांद्याच्या दरासंदर्भात अजित पवारांना बोलण्याची विनंती करण्यात आली होती. कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे, कांद्याच्या दरावर सरकारने काहीतरी मार्ग काढावा, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. मात्र, कांद्यासंदर्भात अजित पवारांनी आपल्या भाषणात एक शब्दही न बोलल्याने भाषणाच्या शेवटी अजित पवारांकडे कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न करत संताप व्यक्त करण्यात आला. तत्पूर्वी, गुरुवारी रात्री संगमनेर येथे आमदार अमोल खताळ यांना कानशिलात लगावल्याची घटना घडली होती. त्यामुळे, संगमनेर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Comments
Add Comment