
भुसावळ विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम : २ लाख ३७ हजार ७१० दंड वसूल
नाशिक : भुसावळ विभागातील भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, खंडवा, अकोला व बडनेरा या स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. ३९९ बिनतिकीट प्रवासी आढळून आले असून, त्यांच्याकडून २ लाख ३७ हजार ७१० इतका दंड वसूल करण्यात आला. प्रवाशांना सुरक्षित, सुकर व आरामदायक प्रवास सुविधा देण्याच्या आपल्या प्रयत्नांचा भाग म्हणून, भुसावळ विभागात नियमितपणे मेल-एक्सप्रेस, पॅसेंजर, विशेष ट्रेनमध्ये व्यापक तिकीट तपासणी मोहीम सुरू आहे.
अनधिकृत प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी, मुख्यालय तसेच सर्व विभागांमध्ये नियमितपणे विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. यामध्ये स्थानक तपासणी , अचानक धाड तपासणी (ॲम्बुश तपासणी), किल्लाबंदी तपासणी (फोर्ट्रेस चेक), व्यापक तपासणी ( इंटेंसिव चेक्स) आणि मेगा तिकीट तपासणी मोहिमा यांचा समावेश आहे.
भुसावळ विभागातील भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, खंडवा, अकोला व बडनेरा या स्थानकांवर दि. २८ ऑगस्ट रोजी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तिकीट तपासनीस, वाणिज्य पर्यवेक्षक तसेच रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) अशा एकूण ७३ कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. रेल्वे अनियमित प्रवास रोखण्यासाठी आणि प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास अनुभव सुनिश्चित करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली आहे. भुसावळ विभाग प्रवाशांना आवाहन करते कि, प्रवाशांनी योग्य आणि वैध तिकीट खरेदी करून प्रवास करावा.