
पाटणा : पाकिस्तान पुरस्कृत जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या किमान तीन दहशतवाद्यांनी नेपाळमार्गे बिहारमध्ये घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. ही माहिती मिळताच बिहार पोलिसांनी हायअलर्ट दिला आहे. दहशतवाद्यांची नावं आणि फोटो बिहारमधील सर्व पोलिस ठाण्यांना पाठवण्यात आली आहेत. गुप्तचर यंत्रणा, बिहार पोलीस आणि पोलिसांचे खबरी दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.
बहावलपूरचा मोहम्मद उस्मान, उमरकोटचा आदिल हुसेन आणि रावळपिंडीचा हसनैन अली अवान या तीन दहशतवाद्यांनी नेपाळमार्गे बिहारमध्ये घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. पाकिस्तान पुरस्कृत जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सदस्य असलेल्या या तीन दहशतवाद्यांना शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. तिघांच्याही पासपोर्टशी संबंधित माहिती देखील बिहारच्या पोलीस ठाण्यांना शेअर करण्यात आली आहे.
तिन्ही दहशतवादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात काठमांडूला पोहोचले होते. काही दिवसांनी त्यांनी नेपाळ सीमा ओलांडली आणि बिहारमध्ये घुसखोरी केली, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. यावर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. यामुळे पोलीस यंत्रणा जास्त खबरदारी घेत आहे.
घुसखोरी केलेले दहशतवादी बिहारमध्ये घातपात घडवून आणण्याची शक्यता आहे. यामुळे भागलपूर, अररिया, किशनगंज, सुपौल, मधुबनी, सीतामढी, पूर्व चंपारण आणि पश्चिम चंपारण येथे दहशतवाद्यांना शोधण्यासाठी तातडीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
याआधीही नेपाळ सीमेवरून दहशतवाद्यांनी बिहारमध्ये घुसखोरी करुन घातपात करण्याचे प्रकार घडले आहेत. गेल्या वर्षी ५ सप्टेंबर रोजी मोतिहारी पोलिसांनी नेपाळ सीमेजवळील भागलपूरमधील बरहपुरा येथील रहिवासी नजरे सद्दाम याला बनावट नोटांसह अटक केली होती. त्याचे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचेही उघड झाले होते. या वर्षी फेब्रुवारीमध्ये एनआयएचे पथक बरहपुरा येथील नजरे सद्दामच्या घरीही पोहोचले. नजरे सद्दामच्या घराची झडती घेण्यात आली आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. आता गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या ताज्या माहितीनंतर पुन्हा एकदा बिहारमध्ये पोलीस यंत्रणा हायअलर्टवर आहे.