सियोल : दक्षिण कोरियामध्ये शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर झाले आहे. मार्च २०२६ पासून हा कायदा लागू होणार असून, विद्यार्थ्यांना शाळेत मोबाईल अथवा इतर कोणतेही स्मार्ट डिव्हाईस वापरता येणार नाहीये.यापूर्वी अनेक देशांनी शाळांमध्ये मोबाईल वापरण्यावर बंदी घातलेली असून, दक्षिण कोरियाचाही त्यात समावेश झाला आहे.
दक्षिण कोरियात शाळांमध्ये मोबाईल बंदीचा कायदा पुढील वर्षी म्हणजे मार्च २०२६ पासून अंमलात येणार आहे. खासदार, पालक आणि शिक्षकांकडून शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या मोबाईल वापराबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे दक्षिण कोरियामध्ये अनेक शाळांनी मोबाईल बंदीचा निर्णय लागू केला.
मुलांना मोबाईलचे व्यसन जडू लागले असून, त्याचा दुष्परिणाम त्यांच्या मनावर होत आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरू लागली आहे. कारण त्यांचा अभ्यासाचा वेळही मोबाईल वापरण्यातच चालला आहे. मोबाईलची मुलांना लागत असलेलं व्यसन चिंताजनक असून, दक्षिण कोरियाच्या कायदेमंडळाने हा निर्णय घेतला. दक्षिण कोरियाच्या संसदेने बुधवारी हे विधेयक मंजूर केले. १६३ पैकी ११५ मते विधेयकाच्या बाजूने पडली.
दक्षिण कोरियापूर्वी अनेक देशांनी शाळांमध्ये मोबाईल वापरण्यावर बंदी घातलेली आहे. फिनलँड, फ्रान्सने मर्यादित स्वरूपात निर्बंध घातलेले आहेत. तिथे लहान मुलांनाच शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी आहे. तर नेदरलँड्स आणि चीनमध्ये शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी घातली आहे.