Thursday, August 28, 2025

Satish Deshmukh Death : मोठी बातमी : जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू; जरांगेंच्या उपोषणापूर्वी धक्कादायक घटना

Satish Deshmukh Death : मोठी बातमी : जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू; जरांगेंच्या उपोषणापूर्वी धक्कादायक घटना

जुन्नर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथून निघालेला मोर्चा सध्या मुंबईच्या दिशेने सरकत आहे. या आंदोलनाचं नेतृत्व मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील करत असून, काल (२७ ऑगस्ट) ते सराटीतून निघाले आणि आज सकाळी ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावर पोहोचले. तेथून दर्शन घेऊन ते पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मात्र, या प्रवासादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. जुन्नरजवळ एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचं नाव सतीश देशमुख असं असून, आंदोलकांच्या मनात यामुळे शोककळा पसरली आहे. मनोज जरांगे मुंबईत उपोषणाला बसण्यापूर्वीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. परंतु, आंदोलनाच्या वातावरणात अचानक झालेल्या या मृत्यूमुळे हळहळ आणि संताप व्यक्त होत असून प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या पोलिस आणि प्रशासनाकडून अधिकृत माहिती घेतली जात असून, या दुर्दैवी घटनेमुळे आंदोलनाचा कल अजूनच गंभीर झाला आहे.

"बळी जाण्याला फडणवीस जबाबदार"

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मोर्चात आज जुन्नरजवळील आंदोलक सतीश देशमुख यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने आंदोलनात शोककळा पसरली आहे. या घटनेवर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील म्हणाले, "मला आता माहिती मिळाली आहे की आमचे देशमुख नावाचे बांधव प्रवासादरम्यान दम छाटल्याने कोसळले आणि त्यांना हार्ट अटॅक आला. ही घटना अत्यंत दुःखद आहे. मी अजूनही अधिक माहिती घेत आहे, परंतु या बळीला जबाबदार फडणवीस साहेब आहेत." ते पुढे म्हणाले की, "जर सरकारने आता तरी मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं, तर आमच्या बांधवांचे जीव गेले नसते. हे आमचे आणखी दोन बळी आहेत. लातूरमध्ये परवाच अशीच घटना घडली आणि आज पुन्हा आमच्या समाजातील एका बांधवाचा जीव गेला. हे थांबायला हवं." मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला वेग येत असतानाच सलग मृत्यूंच्या घटनांमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. यावर आता राज्य सरकार कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आझाद मैदानावर आंदोलनासाठी जरांगेंना ८ तासांची मुभत

मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी फक्त ८ तासांची परवानगी देण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी ही अट मान्य केली असून हमीपत्रही दिलं आहे. मात्र, शिवनेरी किल्ल्यावर पोहोचल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या वक्तव्यामुळे वेगळीच भूमिका घेण्याचे संकेत मिळाले. त्यामुळे आता ते आणि मराठा बांधव प्रशासनाने दिलेल्या वेळमर्यादेचं पालन करणार की ठरवलेल्या चौकटीपलीकडे जाऊन भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचबरोबर जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट मागणी केली आहे की, “आंदोलनावर अटी-शर्ती लादू नका, या बंधनांचा तातडीने पुनर्विचार करा.”

“मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळालाच पाहिजे” – मनोज जरांगे

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. “मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदना फार मोठ्या आहेत. या वेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतल्या पाहिजेत. या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला साथ दिली पाहिजे,” असे जरांगे यांनी स्पष्ट केलं. रायगड आणि शिवनेरीसारख्या ऐतिहासिक स्थळांमधून प्रेरणा घेत असल्याचं सांगून जरांगे म्हणाले की, फडणवीस कुणालाही थांबवू शकत नाहीत. न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे आंदोलनासाठी परवानगी घेतली असली तरी, “फक्त एका दिवसाची परवानगी देणं म्हणजे समाजाची चेष्टा आहे,” अशी टीका त्यांनी केली. जरांगे पुढे म्हणाले, “आमच्या मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली पाहिजे. जाणूनबुजून फक्त एका दिवसाची परवानगी दिली गेली आहे. हे चुकीचं आहे.” यामुळे आता मराठा आरक्षणाच्या लढ्याचं भवितव्य आणि सरकार याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment