
पॅरिस : दुहेरी ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधूने बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या राउंड ऑफ १६ सामन्यात तिने चीनच्या वांग झीला सरळ गेममध्ये पराभूत केले केले.
ऑलिंपिकमध्ये रौप्य आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने जागतिक नंबर-२ वांग झीविरुद्ध आपले वर्चस्व कायम ठेवले. सिंधूने आतापर्यंत वांगविरुद्ध खेळलेल्या पाच सामन्यात तिसऱ्यांदा तिचा पराभव केला आहे. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत १५व्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने पहिल्या गेममध्ये संघर्षपूर्ण लढतीनंतर २१-१९ च्या फरकाने विजय मिळवला.
पहिला गेम जिंकल्यानंतर सिंधूने दुसऱ्या गेममध्येही १२-६ अशी आघाडी घेतली. तिने ही आघाडी कायम ठेवली आणि दुसरा गेम २१-१५ च्या फरकाने जिंकून सामना जिंकला. क्वार्टर फायनलमध्ये सिंधूचा सामना जागतिक नंबर-१ दक्षिण कोरियाच्या अन से यंगशी होण्याची शक्यता आहे.
जागतिक क्रमवारीत १६ व्या क्रमांकावर असलेल्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रिस्टो या भारतीय जोडीने विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हाँगकाँगच्या तांग चुन मिन आणि से यिंग सुत यांनी पहिल्या सामन्यात दोघांचा २१-१९ अशा फरकाने पराभव केला. दुसऱ्या सामन्यात ध्रुव-तनिषाने पुनरागमन केले आणि २१-१२ असा विजय मिळवत सामना बरोबरीत आणला. भारतीय जोडीने तिसरा सामना २१-१५ अशा फरकाने जिंकला आणि क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.