
मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्यात घटस्फोटाची चर्चा सुरू होती. मात्र, गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर या जोडप्याने एकत्र येऊन या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. गोविंदाच्या घरी बाप्पाच्या आगमनावेळी सुनीताने मीडियाशी संवाद साधताना "गोविंदा फक्त माझाच आहे" असे ठामपणे सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येत होत्या. सुनीताने वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचा दावाही काही माध्यमांनी केला होता. या अर्जात 'अत्याचार' आणि 'फसवणूक' असे गंभीर आरोप केल्याचेही म्हटले जात होते. या अफवांवर दोघांनीही थेट प्रतिक्रिया दिली नव्हती.
गणेश चतुर्थीने मिटवले वाद
पण, यावर्षीच्या गणेश चतुर्थीनिमित्त गोविंदा आणि सुनीता त्यांच्या मुलांसोबत एकत्र दिसले. दोघांनीही मीडियासमोर एकत्र फोटो काढले आणि एकमेकांबद्दलचे प्रेम दाखवले. यावेळी पत्रकारांनी त्यांना घटस्फोटाबद्दल विचारले असता, सुनीता आहूजा यांनी स्पष्टपणे सांगितले की, "तुम्ही लोक इथे वाद ऐकण्यासाठी आला आहात की 'गणपती बाप्पा मोरया' म्हणायला?" असे म्हणत त्यांनी हा प्रश्न हसून टाळला.
गोविंदाचेही भावनिक वक्तव्य
यावेळी गोविंदानेही आपल्या कुटुंबासाठी शुभेच्छा मागितल्या. त्याने म्हटले, "बाप्पाचा आशीर्वाद मिळाल्यावर कुटुंबातील सर्व दु:ख दूर होतात. मला विशेषतः माझा मुलगा यश आणि मुलगी टीना यांच्यासाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत. तुम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि आशीर्वाद द्यावा."
गोविंदा आणि सुनीता यांचा एकत्र फोटो आणि सुनीताचे हे विधान यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आता पूर्णपणे थांबल्या आहेत. दोघांच्याही चाहत्यांनी यावर आनंद व्यक्त केला आहे.