बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाचा वाद वाढतच चालला आहे. जॉली एलएलबी ३ या चित्रपटात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्यासह सौरभ शुक्ला, अमृता राव, हुमा कुरेशी, नंदिनी कपूर आदि कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हा चित्रपट न्यायालयीन कथेवर आधारित आहे. या चित्रपटाला काही वकिलांनी विरोध दर्शवला आहे. आता पाटणा उच्च न्यायालयात या चित्रपटाविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की ‘जॉली एलएलबी ३’ मध्ये न्यायव्यवस्था आणि कायदेशीर व्यवसायाचे अपमानजनक पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे. यामुळे वकिलांची आणि संपूर्ण न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा दुखावली गेली आहे. ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटाविरुद्ध वकील नीरज कुमार यांनी पाटणा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याने न्यायालयाला या चित्रपटावर, त्यातील गाण्यांवर आणि प्रमोशनवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले ‘मेरा भाई वकील’ हे गाणे आणि या चित्रपटाच्या ट्रेलरचा या प्रकरणात उल्लेख करण्यात आला आहे. याचिकेत म्हटले आहे की, चित्रपटाच्या गाण्यावर आणि प्रमोशनल मटेरियलमध्ये कायदेशीर व्यवसाय हास्यास्पदरीत्या दाखवण्यात आले आहे. यामुळे केवळ वकिलांची प्रतिष्ठाच खराब होत नाही तर जनतेमध्ये न्यायव्यवस्थेची प्रतिमाही डागाळली जात आहे. याचिकेत, हायकोर्टाला जॉली एलएलबी ३ चे वादग्रस्त गाणे आणि ट्रेलरवर तात्काळ बंदी घालण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच, चित्रपट निर्मात्यांनी बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि बिहार स्टेट बार कौन्सिलची परवानगी घेऊन चित्रपटात आवश्यक बदल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.