मुंबई : दीड दिवसांच्या गणरायांना साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. गणरायाच्या निरोपाला रिमझिम पावसाच्या सरी जलाभिषेक करण्यासाठी दाखल झाल्या होत्या. मोठ्या आनंदाने, वाजत-गाजत, ढोल-ताशा आणि टाळ, मृदंगाच्या गजरात ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त विनवणी करत भाविकांनी आपल्या लाड्क्या बाप्पाला निरोप दिला. गणपती विसर्जनासाठी ठिकठिकाणी मुंबई महानगरपालिकेतर्फे विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील तलाव, कृत्रिम तलाव, समुद्रकिनाऱ्यावर भाविकांची तुफान गर्दी होती. दुपारनंतर वाजत-गाजत, गुलाल उधळत, येणाऱ्या-जाणाऱ्याला प्रसादाचे वाटप करत कुटुंबे विसर्जनस्थळी मार्गस्थ होत होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिस दल यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, राजकीय पक्ष यांच्यातर्फे पाणी, अन्नदान सेवा प्रदान करण्यात आली होती.