
पुणे : गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पुण्यात भक्तिभाव आणि मंत्रोच्चारांच्या गजरात झाली. शहरातील सर्वाधिक लोकप्रिय असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यावर्षी पद्मनाभ मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये विराजमान झाले असून, पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतले. या पार्श्वभूमीवर, गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ॠषीपंचमी निमित्ताने दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती करून स्त्रीशक्तीचा अद्वितीय जागर घडवला. या भव्य उपक्रमाचे आयोजन श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे करण्यात आले होते. अथर्वशीर्षाच्या गजराने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता. पहाटेच्या वेळी झालेल्या या भव्य धार्मिक सोहळ्यामुळे पुणे शहरात भक्तिभाव, अध्यात्म आणि स्त्रीशक्तीचा संगम अनुभवायला मिळाला.
३५ हजार महिलांचा सामूहिक उत्साह
“ओम गं गणपतये नमः” आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषाने पुण्यात भक्तिभावाचा महासागर उसळला. तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठण करत गणरायाला सामूहिक नमन केले. ॠषीपंचमी निमित्त आयोजित या भव्य सोहळ्यात परिसरात अपार ऊर्जा आणि भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले. अथर्वशीर्ष पठणानंतर महिलांनी महाआरती आणि गणगजर करून संपूर्ण परिसराला भक्तिरसात रंगवले. या विशेष उपक्रमाला खासदार सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनीही सामूहिक पठणात सहभागी होत भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेतला. पुण्यात पावसाच्या हलक्या सरी बरसत असतानाही महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. विशेष म्हणजे, पारंपरिक वेशभूषेत हजारो महिला मध्यरात्री दोन वाजल्यापासून या उपक्रमासाठी उपस्थित राहू लागल्या होत्या. त्यांच्या सहभागामुळे गणेशोत्सवाच्या या सोहळ्याला एक वेगळेच वैभव प्राप्त झाले. यंदाचे वर्ष या उपक्रमाचे ४० वे वर्ष ठरले असून, दीर्घ परंपरेला महिलांनी पुन्हा एकदा मोठ्या संख्येने हजेरी लावून नवा इतिहास रचला आहे.

भारताचा आर्थिक विकास दर दशकभर सरासरी ६% पेक्षा जास्त राहण्याचा अंदाज प्रतिनिधी: युएसने घातलेल्या टॅरिफ शुल्काच्या दबावा व्यतिरिक्तही भारताची ...
दगडूशेठ गणपतीसमोर ॠषीपंचमी सोहळ्याची भव्य सुरुवात
भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात शंखनादाने सोहळ्याची सुरुवात होताच परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर मनाला शांत करणारा ओंकार जप आणि “गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना” या गणेशगीताच्या सादरीकरणाने वातावरण अधिकच मंत्रमुग्ध झाले. यानंतर महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण करत गणरायाला नमन केले. “मोरया मोरया दगडूशेठ मोरया…” या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमत होता. प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि भक्तिभाव स्पष्टपणे जाणवत होता.
नानावाड्यापर्यंत महिलांची गर्दी
दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नानावाड्यापर्यंतचा परिसर सोमवारी महिलांच्या उपस्थितीने अक्षरशः फुलून गेला होता. हजारो महिलांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून अथर्वशीर्ष पठणात सहभाग घेतला. संपूर्ण परिसरात गणेशभक्तीचा आणि उत्साहाचा जल्लोष अनुभवायला मिळत होता. संपूर्ण सोहळा भक्तीरसात रंगून गेला आणि त्याची सांगता झाली ती भव्य आरतीने. आरती सुरू होताच महिलांच्या जयघोषाने वातावरण भारून गेले. हात उंचावत आणि टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गणरायाला नमन केले. आरतीचा प्रत्येक सूर आणि टाळ्यांचा प्रत्येक आवाज हा गणेशभक्तीच्या उर्जेने ओतप्रोत भरलेला होता. भक्ती, आनंद आणि एकात्मतेने भरलेल्या या सोहळ्यामुळे पुण्यातील वातावरण अक्षरशः गणेशमय झाले होते.
View this post on Instagram
खासदार सुनेत्रा पवार यांची भावनिक प्रार्थना
या भक्तिरसात रंगलेल्या सोहळ्यात खासदार सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती होती. अथर्वशीर्ष पठणात सहभागी झाल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “या उपक्रमासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातील विविध भागांतून महिला मोठ्या संख्येने पुण्यात दाखल झाल्या आहेत. गणेशचरणी लीन होत, श्रद्धा आणि भक्तीभावाने सर्वजणी एकत्र आल्या आहेत, हे खरोखरच प्रेरणादायी आहे.” गणरायाला नमन करताना सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या की, “बाप्पाच्या कृपेने हे वर्ष सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, प्रगती आणि भरभराट घेऊन येवो,” अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या प्रार्थनेमुळे उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकत होते.
परदेशी अभिनेत्रीची उपस्थिती, गणेशभक्तीत रंगला पुणे
पुण्याच्या गणेशोत्सवाची आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, तर ती जगभरात पोहोचली आहे. याची प्रचीती यंदाही आली. अथर्वशीर्ष पठणाच्या सोहळ्यासाठी इटली येथील सुप्रसिद्ध अभिनेत्री ऍना मारा यांनी खास उपस्थित राहून सहभाग नोंदवला. गणेशभक्तीच्या रंगात रंगून गेलेल्या या सोहळ्यात परदेशी पाहुणीचा सहभाग पाहून भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. पुण्याच्या रस्त्यांवर, दगडूशेठच्या मंडपात आणि आसपासच्या परिसरात गणेशभक्तीने भारलेले वातावरण अनुभवायला मिळाले. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. त्यातच परदेशी अभिनेत्रीच्या सहभागामुळे या सोहळ्याची शान अधिक वाढली.