सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त तीन चित्रपट उत्तम कमाई करत आहेत. एकीकडे ‘कुली’ आणि ‘वॉर २’ हे दोन मोठे चित्रपट चांगली कमाई करत आहेत, तर दुसरीकडे ‘महावतार नरसिंह’ गेल्या ३४ दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर अजूनही सुरू आहे. रजनीकांतच्या ५० वा प्रदर्शित झालेला ‘कुली’ हा अॅक्शनपॅक्ड चित्रपट दुसऱ्या आठवड्यातही चांगली कमाई करत आहे. बुधवारी १४ व्या दिवशी या चित्रपटाने ५.५६ कोटी रुपये कमावले, तर मंगळवारी चित्रपटाचे कलेक्शन फक्त ३.६५ कोटी रुपये होते. ‘कुली’ला गणेश चतुर्थीच्या सुट्टीचा फायदा झाला असून १४ दिवसांत ‘कुली’चे एकूण कलेक्शन २६९.८१ कोटी रुपये झाले आहे. दुसरीकडे, ‘कुली’ सोबत प्रदर्शित झालेला हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर स्टारर ‘वॉर २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी झाला आहे; परंतु चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये सातत्याने घसरण होत आहे. मंगळवारी २.७५ कोटी रुपये कमाई करणाऱ्या ‘वॉर २’ने बुधवारी फक्त २.५० कोटी रुपये कमाई केली, तर १४ दिवसांत चित्रपटाची एकूण कमाई २२९.७५ कोटी रुपये झाली आहे. ‘वॉर २’ आणि ‘कुली’ सारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये, ‘महावतार नरसिंह’ ३४ दिवसांनंतरही उत्तम कामगिरी करत आहे. बुधवारी, चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. मंगळवारी १.७५ कोटी रुपये कमाई करणाऱ्या 'महावतार नरसिंह'ने बुधवारी म्हणजे ३४ व्या दिवशी २.२५ कोटी रुपये कमाई केली आहे. अशाप्रकारे, 'महावतार नरसिंह'ची ३४ दिवसांत एकूण कमाई २३७.१० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.