Tuesday, August 26, 2025

शोध तरुण मनांचा

शोध तरुण मनांचा

मराठी भाषेचा विकास आणि आव्हाने हा विषय सध्या सतत चर्चेत आहे. मला नेहमी असे वाटते की, येणाऱ्या काळात मराठीच्या विकासाच्या दिशा शोधण्याचे काम तरुणाईकडूनच होईल. तरुण मन सातत्याने नव्याचा शोध घेणारे असते.या काळात तनामनात एक वेगळीच ऊर्जा सळसळत असते. त्यामुळे हातून नवी कामे उभी राहतात. शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांचे काम मी जेव्हा पाहते तेव्हा तरुणवयात त्यांनी त्यांच्या कामाचा पाया कसा घातला हे पाहून मन थक्क होते. प्राध्यापक ही सुस्थिर सुरक्षित नोकरी मानली जाते. त्यात अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणजे अगदी सुरक्षित!

त्या वयात अनुताई वाघ यांचे आदिवासी मुलांच्या शिक्षणातील काम सरांनी समजून घेतले आणि एसएनडीटी विद्यापीठातील नोकरी सोडून सरांनी स्वतःला आदिवासी मुलांच्या शिक्षणाच्या कामात अक्षरशः झोकून दिले. ग्राममंगलचा इतिहास यातूनच घडला. आज भल्या भल्या इंग्रजी शाळा ग्राममंगलकडून बालशिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

नुकतीच मी अनघा पेंडसे या तरुण मुलीला भेटले. तिच्याशी मी पंधरा वीस मिनिटे जे काही बोलले त्यात मराठी विषयीचे प्रेम ओतप्रोत भरलेले होते. मात्र हे प्रेम आंधळे नव्हते, तर ते मराठीच्या विकासाची तंत्रज्ञानाची सांगड कशी घालता येईल याचा विचार करणारे होते.

अलीकडे एआय तंत्रज्ञानाची सांगड मराठीशी कशी घालता येईल यावर अनघा काम करते आहे. एकीकडे शब्दांकन, दुसरीकडे ब्लॉग, पुस्तके संपादित करणे असे एक ना दोन अनेक विषय तिच्या अभ्यासाच्या कक्षेत आहेत. ‘रील’ तयार करणे हा अलीकडच्या मुलांच्या आवडीचा विषय पण त्याकरता नेमके काय करायला हवे यावर अनघा अतिशय उत्सुकेने बोलते. अमराठी भाषकांना मराठी शिकवणे हा तिच्या विशेष आवडीचा विषय आहे. खेळांच्या माध्यमातून तो अधिक यशस्वीपणे कसा पोहोचवता येईल, यावर लक्ष केंद्रित करून अनघा आणि तिचे सहकारी मदत करतात.

शालेय स्तरावरील मुलांसाठी अनघा शब्दांचे वैभव वाढविणाऱ्या कार्यशाळा घेते. खेरीज अंध मुलांसाठी रोजगाराच्या विविध संधी निर्माण करण्याचे काम ती आणि तिचे सहकारी एकत्रितपणे करतात. त्याकरता अंध मुलांच्या भाषेवर विशेष काम करतात. साहित्याचा अभ्यास करून ही मुलगी साहित्याच्या चौकटीबाहेर पडून अनुवादाच्या क्षेत्रातही रमली आहे. कायद्याच्या क्षेत्रातील अनुवादासंदर्भातील जिज्ञासेतून ती तांत्रिक अनुवादाचा प्रत्यक्ष अनुभव घेते आहे.

अनघासारखी तरुण मने मराठीची स्पंदने मनापासून ऐकत आहेत ही खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. अलीकडे मी अशा तरुणाईचा शोध घेत राहते. अध्यापन आणि अध्ययन ही आदान प्रदानातून घडणारी प्रक्रिया आहे. आजची तरुणाई खूप काही शिकवते आहे. मात्र शिकण्याची तयारी शिक्षकांनीही दाखवली पाहिजे.

Comments
Add Comment