Wednesday, August 27, 2025

बुद्धीची देवता

बुद्धीची देवता

संपूर्ण जनतेच्या ममत्त्वाचा, दैवत्वाचा, अस्मितेचा, श्रद्धाळू असा हा एकमेव गणेश. गणरायाचे आगमन म्हणजे सर्वांसाठी आनंदाची पर्वणीच असते. जोरदार सरींची बरसात झेलून सुखावलेले समस्त जीव आता उत्सव पर्वामध्ये चिंब भिजण्यासाठी सज्ज झाले आहेत. विघ्न दूर करून सुखाची चाहूल देणाऱ्या बाप्पाचे आज आगमन झाले. ऐलमा, पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा... अवतीभवतीचा आनंद व उत्साहाच्या हिरव्यागार वातावरणात भाविकांनी गणेशाचे स्वागत केले.

प्रत्येकाच्या घरोघरी उत्सवाची सज्जता सुरू असल्यामुळे भारलेले वातावरण अनुभवायला मिळत असते. वास्तविक गणेश हा विद्येचा देव आणि ज्ञानाचा अधिपती. सण आणि उत्सव साजरे करताना आपण संस्कृती परंपरेचा प्रवाह पुढे नेत असतोच. आपल्या समाज सुधारकांनी मात्र उत्सव आणि परंपरा यांचा विचार राष्ट्रासाठी कसा केला याचे उत्तम उदाहरण म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव. सार्वजनिक गणेशोत्सवाचा उल्लेख जेव्हा जेव्हा होतो तेव्हा लोकमान्य टिळकांचे स्मरण होणे स्वाभाविक आहे.

गणेशोत्सवाची सुरुवात झाली ती भारतीयांना एकत्र आणण्यासाठी, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी. १८९३ साली स्थापन केलेला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा अनोखा प्रयत्न. जो पुढे जाऊन यशस्वी झाला. एका मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापासून सुरुवात होऊन घराघरांत, मंडपात गणराज विराजमान झाले आहेत. जीवनात अनोखे रंग भरणारा, स्नेह, प्रेम वाढवणारा हा उत्सव आहे. आजच्या घडीचे संघटन, शक्तीचे प्रतीक दर्शवितो. हे सर्व करत असताना या आनंदमय वातावरणात सर्व समाजाने एकत्र यावे त्यांच्यात बंधुभाव वाढीस लागावा, एकमेकांप्रती प्रेम, आपुलकी निर्माण व्हावी या उदात्त हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली.

चातुर्मासात श्रावणसरींनी आलेला पाऊस आपल्याबरोबर हिंदू सणांना घेऊन येतो. हिंदू धर्मातील ईश्वराची रूपे वेगळी असली तरी शेवटी सर्वांचा ईश्वर एकच आहे. हे निस्सीम सत्य विसरता कामा नये. चौदा विद्या, चौसष्ट कलेचा अधिपती असलेल्या श्रींचे आगमन सर्वांसाठी आनंदरुपी अमृत सोहळा आहे. बाप्पा आला रे आला... किती जिव्हाळ्याचा आतून येणारा आवाज. गोंडस, गोजिरवाणा, लोभस, लडिवाळ, सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन वाजत गाजत मोठ्या उत्साहात घरोघरी, गल्लोगल्ली, शहरात तसेच गावात झाले आहे. घरामध्ये गणपती बाप्पा जेव्हा विराजमान होतात तेव्हा घराचे मंदिर आपोआपच होऊन जाते. या पवित्र वातावरणात कधी दहा दिवस संपतात तेच समजत नाही. यामध्ये गौरी आगमन, गौरी पूजन व गौरी गणपती विसर्जन हे सण उत्सव आनंदात साजरे केले जातात. आपल्याकडे सर्व असतातच यासाठीच की मरगळलेल्या मनाला पुन्हा चैतन्य ऊर्जा मिळावी ही ऊर्जा मिळताना मनामध्ये पवित्र भाव असावा. अनेक पिढ्यान पिढ्यांपासून बाप्पाची अतिशय मनोभावे पूजा केली जाते. लहान मुलांपासून ते वडीलधाऱ्यापर्यंत श्री गणेशाचे आगमन झाल्यावर प्रत्येकजण बाप्पाची सेवा करण्यात दंग होऊन जातो. कारण गणेश दैवत हे बुद्धीची देवता आहे. तसेच तो विघ्नहर्ता ही आहे. प्रथम पूजेचा शुभारंभाचा मान श्री गणेशाकडे जातो. अशा गणाचा अधिपती असलेल्या श्री गणेशाचे स्थान आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण आहे. बाप्पाचा आवडता प्रसाद मोदक. बाप्पाच्या नैवेद्याचा आधीच जिभेवर उड्या मारायला लागतो. या दिवसात एक वेगळेच वातावरण न्याहाळायला मिळत असते. बाप्पा विराजमान झाल्यावर विविध सुगंधी अगरबत्यांचा दरवळणारा सुवास, शेणाने सारवलेले अंगण, मातीच्या भितींना केलेली पानाफुलांची रंगरंगोटी, दाराला लावलेले तोरण, रांगोळीने सजलेले अंगण मन प्रसन्न करते. बाप्पाच्या आगमनामुळे रक्ताची नाती जवळ येतात, उत्साह, आनंदाचे वातावरण निर्माण होते.

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ| निर्विघ्न कुरुमे देव, सर्वकार्येषु सर्वदा! गोलाकार सोंडेचा, विशाल शरीराचा, सूर्या समान तेजस्वी अशा विघ्नहर्ताची आमच्यावर कृपा असावी. आपल्या या वैदिक संस्कृतीमध्ये एक दयाळू देवता श्री गणेश विघ्नहर्ता बुद्धिवंत, सामर्थ्यवंत, शक्तीवन्त, रूपवंत देवता आहे. गणेश या संस्कृत शब्दाप्रमाणे अर्थ गण म्हणजे समूह तर ईश म्हणजे परमेश्वर.

गणपती म्हणजे प्राणिमात्रांच्या समूहाचे रक्षण करणारा रक्षक. गणेश हा महादेव आणि पार्वतीचा पुत्र आहे. याबद्दलची गोष्ट प्रत्येकाला माहीतच आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून वेद व्यासांनी डोळे मिटवून भागवत कथा सलग दहा दिवस गणपतीला ऐकवली. जी गणपतीने आपल्या दाताने लिहिली. दहा दिवसानंतर जेव्हा व्यासांनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिले की, गणेश एका जागी सतत बसून लिहिल्यामुळे अतिशय उष्णता शरीरात निर्माण झाली. त्यामुळे जवळील पाण्याच्या कुंडात वेद व्यासांनी त्यांना थंड केले. त्यामुळेच भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणरायाची स्थापना केली जाते आणि शितल करण्यासाठी अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते.

गणेश उत्सव हा बाल आणि तरुणांसाठी एक आनंदोत्सवच असतो. अशा वातावरणात कल्पनाशक्तीला वाव मिळतो. कौशल्याच्या सादरीकरणाची संधी मिळते. नवनवीन मित्र-मैत्रिणी गवसतात, एकत्र काम केल्यामुळे सुसंवादाला चालना मिळते. सगळे एका पातळीवर येऊन काम करत असल्यामुळे जवळीकता वाढते. एकप्रकारे या अनौपचारिक वातावरणात मैत्री फुलते. दोस्ती घट्ट होते. एकंदरीत संपूर्ण समाज या महोत्सवात विरघळून जातो, रममान होतो.

श्री गणेश विद्येची देवता आहे. तसेच ती कलेची ही देवता आहे. त्यामुळे कलाकार मंडळी ही गणेश उत्सवामध्ये आपली कला सादर करण्यासाठी रंगून गेलेले असतात. गणपतीसमोर ठेवलेले लाडू, मोदक असे गोड पदार्थ लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये बाळ गोपाळही रमून जातात. काहींच्या घरी दीड दिवसाचे गणपती तर काहींच्या घरी सात दिवसांचे गणपती असतात. पंचमी दिवशी दीड दिवसाचे गणपती जातात. त्यादिवशी ऋषीपंचमी साजरी केली जाते. याच दिवसात गौरीचे आगमन होते. गौरी पूजन आणि विसर्जनाचा सोहळा पार पडतो. काही गणपतीचे विसर्जन गौरी सोबतच होते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वच गणपतीचे विसर्जन होते. गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या. गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला.

- रसिका मेंगळे

Comments
Add Comment