माेरपीस : पूजा काळे
चांदीचा पाट सोन्याचे ताट,
चमचा वाट्यांचा वेगळाचं थाट.
पेल्याला येई अमृताची शान.
लोणची-पापडाला भारीचं मान,
दादा वाढपी, वहिनी भरते पान.
रूचकर पदार्थ लागती किती छान,
कोपरा राखतो पदार्थाचे भान.
सणासुदीला पंगतीत मांडी घालून बसतानाचे प्रसंग आठवले की, आपली समृद्धी जाणवते. आजीची संस्कार गीतं जशीच्या तशी आठवतात. सरस गोष्टी, रम्यककथा, सुमधुर गीतं, बाळबोध कहाण्या यात आकारलेलं आमचं बालपण म्हणजे संस्कृतीचे निशाण फडकवायला निघालेले आम्ही धर्मवीरचं. बालपण सरलं तरी संस्कृतीसंवर्धक संस्कार पगडा अजूनही शाबूत आहे. संस्कृती वेल संस्कारक्षम पिढी घडवतो. महाराष्ट्र धर्म आणि अभिमानाशी निगडीत सणांच्या बरोबरीत वाटा उचलणाऱ्या मागील अनेक पिढ्यांचा अनुभव बोलका आहे. शिकवणुकीवर आधारित असलेल्या संस्काराचं मोल अमूल्य आहे. चांदीच्या पाटाची गोष्ट त्याहून वेगळी नाही. आपल्याकडे खाली बसायला लाकडी पाट देण्याची प्रथा आहे. म्हणजे लग्नात वधूवरांसोबत, यजमान आणि भटजींना देण्यात येणारा पाट, सणवार, ओवाळणी करिता रांगोळी घालून सजवलेला पाट, सत्यनारायण पूजेसाठी शाल पांघरलेला पाट, सवाष्ण पूजेसाठी फुलांचा पाट, पाडव्याला गुढी उभारलेला निरांजनी पाट, अंगभर उटणं चोपण्यासाठी आणि हळद माखण्यासाठी सजलेले ताम्हण पाट, दिवाळसण, पाडवा, ओवसा आणि मुख्यत्वे भाद्रपद चतुर्थीच्या गणेश प्रतिष्ठापनासाठी प्रतीक्षेत असणारे, पण विसर्जनाच्या दिवशी भावविभोर होणारे चांदीचे पाट. ज्यावर माती रूपातल्या देवाचं अस्तित्व गोठतं जे पुढील वर्षापर्यंत पुरतं. अशाप्रकारे धार्मिक, सामाजिक कामासाठी पाटाचे अनेक दाखले देता येतील.
लखलखीत शुभ्र आणि समृद्धीचे प्रतीक मानलेल्या चांदीच्या धातूला भारतीय संस्कृतीत महत्त्व आहे. लाकडी पाटापेक्षा चांदीचा वर्ख चढवलेल्या पाटाच्या श्रीमंतीला, ऐश्वर्याला तोड नाही. खुद्द गणरायाची स्थापना ज्या पाटावर होते ते पाट देवत्वास पावतात. भारतीय संस्कृतीत आवश्यक मानलेल्या पाटाचा धार्मिक, सामाजिक कार्यातला वापर झळाळी देणारा असतो. शुभकार्य, पूजा, भेटवस्तू देण्यास पाट वापरला जातो, जो दिसायला सुंदर, नाजूक, आकर्षक असतो. चांदीचा पाट विशेष प्रसंगी वापरात असल्याने त्या-त्या वस्तूंची प्रतिष्ठा वाढते. चांदीच्या धातूचा चंद्राशी संबंधित मान आहे.
शीतल आणि शुभ्रतेच्या सगळ्या मापात अव्वल असल्याने अध्यात्मिक, धार्मिक शुभप्रसंगी चांदीच्या वस्तू वापरात येऊ लागल्या. चांदीच्या पाटावर, चौरंगावर विराजमान होणाऱ्याची तुलना कुणाशीचं होऊ शकत नाही. भारतीय प्राचीन परंपरासुद्धा याला अपवाद नाही. मजेशीर म्हणजे काही प्रसंगात हे लाकडी पाट बरीचं मदत करतात. दिवाळीसारख्या सणात ढीगभर करंज्या करण्यात पाटाचा हातभार असतो. तितकाचं तो तुळशीच्या लग्नाला ऊभा राहिलेल्या छोट्या नवरदेवाला उचलण्यात सुद्धा असतो. पाट म्हणजे आसन ज्यावर स्थानापन्न होता येतं. देवदेवतांपासून आदी मानवापर्यंतचा पाटाचा प्रवास असावा, म्हणूनचं रामायणात सुद्धा पाटाविषयीची नोंद आढळते. ती अशी...
‘सेतू बांधिला गोट्याने,
मोती टाकले सीतेने.
सीतेला हनुमंताची साथ,
सिता-रामाची पाहत होती वाट.
चांदीचा चांदीचा चौरंग पाट,
सीता-रामाची पाहत होती वाट.
आज भाद्रपद गणेश चतुर्थीच्या निमित्ताने चांदीच्या पाटावर विराजमान झालेल्या गणेश मूर्ती डोळ्यांत सामावून घेतानाचा आनंद अद्वितीय असेल. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी होणारं श्रीचं आगमन म्हणजे आम्हाला कोण आनंद..! दहा दिवसांसाठी पाहुणा बनून आलेल्या या देवतेचं सान्निध्य लाभणं, त्यातून इच्छापूर्ती आकांक्षा पूर्णत्वास जाणं हा दैवयोग होय. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली एक सामाजिक चळवळ आज सार्वजनिक रूपाच्या पलीकडे जाऊन एक घर एक गणपती प्रकारे नावारूपाला येत आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पाटावर विराजमान बालमूर्त्या, विविधांगी गणेशाची रूप म्हणजे “तू सुखकर्ता तू दुखहर्ता रूप पाहता लोचनीचे सूर.” ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाचे स्वागत होईल, तर चांदीच्या पाटावर आसनस्थ एकदंत कृपादृष्टीने भक्तांकडे पाहतील. दया, माया, ममता, करुणेचा अनादी भाव डोळ्यांतून पाझरेल. हे गणाधिशा तू हिंदू हत्ती देवता संरक्षण मार्गातील अडथळे दूर करण्याचे, हस्तदंतातील भौतिक सामर्थ्याची कार्यक्षमतेचं शाश्वत प्रतीक आहेस. म्हणूनचं हिंदू धर्मातल्या लोकप्रिय देवतांपैकी तू एक सर्वोत्तम भाव आहेस. कला, विज्ञान, संरक्षक आणि बुद्धीचा देव म्हणून आम्ही तुझी सेवा करतो. विघ्ने दूर करून आशीर्वचनाने भक्ताला मार्ग दाखवण्यासोबत सिद्धी म्हणजे आध्यात्मिक प्राप्ती, बुद्धीचे शहाणपण आणि रिद्धी म्हणजे संपत्ती, सुख समृद्धी देणाऱ्या गणनायका आम्ही तुझी कीर्ती गाऊ तेवढी थोडीचं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...
दाही दिशातून दुमदुमणाऱ्या चैतन्यमय अविष्काराने आपण भावुक होऊ. चंदनापरी देह झिजला, परी देवा भाव न कळलाचा जल्लोष होईल. मंडळाचे राजे महाराजे सोहळ्याचे आकर्षण ठरतील. देवत्वाला उंची लाभेल. सदा दुर्वांची जुडी तुज वाहता मूर्ती तुझी साजिरी दिसे ही अनंता. भक्तिमय वातावरणात अनंताची लडिवाळ रूप परमेश्वरी साक्षात्कार घडवतील.
चांदीच्या पाटावरील तमोगुणाला, रजोगुणाला दंडवत. एकदंत वक्रतुंड गौरीनंदना, साष्टांग नमन तुझे श्री गजानन आगमन सोहळा मार्गक्रमण करेल. रस्त्यातून वाट काढत जाणारी चांदी पाटावरील ध्यानस्थ मूर्ती शांत सोज्वळ भासेल. दुर्वा जास्वंदीच्या फुलांनी सजेल. दहा दिवसांत चांदीच्या पाटाला सोन्याची झळाळी चढेल. ओम् गं गणपतये नम: स्तोत्र मंत्रोच्चाराने विश्व मोहीत होईल. चांदीचा पाट मात्र देवाच्या चरणाशी आत्मानंदी असेल स्वत:चं अस्तित्व विसरत.