
मुंबई:आजपासून गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2025) ला सुरुवात झाली असून, हा उत्सव भक्तिपूर्वक वातावरणात आणि तितक्याच उत्साहाने साजरा करण्यासाठी गणेशभक्तांची देखील पूर्णपणे तयारी झाली आहे. दरम्यान मुंबईच्या प्रतिष्ठित गणपती मंडळांपैकी एक असलेल्या लालबागचा राजा येथे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यापूर्वी कधीच झाले नव्हते असे अद्भुत लाईव्ह कॉन्सर्ट लालबागच्या राजाला होणार आहे. विशेष म्हणजे, ९१ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होणार असून, याचा पहिला मान प्रसिद्ध मराठी आणि हिंदी पार्श्वगायक राहुल वैद्य याला मिळाला आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक मंडळ हे गणेशोत्सव काळातील सर्वात गर्दीचे ठिकाण असते. हा गणपती नवसाला पावतो अशी अनेकांची धारणा आहे, आणि यामुळेच देशभरातून हजारो भाविक लालबागच्या राजाला दर्शनाला येतात. मात्र यावर्षी राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी गणेश चतुर्थीला मंडळ प्रशासनाने गणेश भक्तिपर सुमधुर गाण्याचे लाईव्ह कॉन्सर्ट ठेवले आहे. ज्यात गाण्याचा पहिला मान गायक राहुल वैद्य याला मिळाला आहे.
राहुलने त्याच्या इंस्टाग्रामवर या संदर्भात एक पोस्टर शेअर करत माहिती दिली, ज्यात त्याने लिहिले, "९१ वर्षांच्या इतिहासात मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठित लालबागचा राजा येथे सादरीकरण करणारा पहिला कलाकार होण्यापासून मला खूप आनंद झाला! २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता जिओहॉटस्टारवर लाईव्ह पहा."
राहुलने आपल्याला मिळालेल्या या संधीचे सोने करण्यासाठी पूर्णपणे तयारी केली असल्याचे सांगितले. एएनआयशी बोलताना तो म्हणाला "जेव्हाही मला सादरीकरणाची संधी मिळते आणि जेव्हाही माझा संगीत कार्यक्रम असतो तेव्हा मी खूप उत्साही असतो. मात्र यावेळी, काही तरी वेगळेच वाटते आहे, कारण मी ज्या ठिकाणी सादरीकरण करणार आहे त्या ठिकाणामुळे माझा उत्साह आणखीच वाढला आहे. लालबागचा राजा हे सर्वात मंगलदायी आणि आशीर्वादित असा रंगमंच आहे जो कोणीही अनुभवू शकतो."