अखेर मराठा आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी मिळाली, पण...

आझाद मैदानावर मराठा आंदोलनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एका दिवसाची परवानगी दिली


मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची रणशिंगे फुंकली गेली आहेत. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. मराठा आंदोलनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने अखेर परवानगी दिली असली, तरी या परवानगीवर कठोर अटी लादण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ही परवानगी केवळ एका दिवसापुरतीच मर्यादित आहे.


गेल्या काही दिवसांपासून या आंदोलनावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. सुरुवातीला उच्च न्यायालयाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनास परवानगी नाकारली होती. मात्र, पुढील सुनावणीनंतर जरांगे पाटलांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची मुभा देण्यात आली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हे आंदोलन सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेतच करता येणार असून, आंदोलकांची कमाल संख्या पाच हजारांपर्यंत मर्यादित राहील. तसेच, कोणत्याही शासकीय सुट्टीच्या दिवशी, शनिवारी किंवा रविवारी आंदोलन करण्यास परवानगी नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


आंदोलनासाठी काही कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. आंदोलकांना आझाद मैदानातील राखीव जागेतच आंदोलन करावे लागेल. या ठिकाणी ध्वनीक्षेपक वा गोंगाट करणाऱ्या उपकरणांचा परवानगीशिवाय वापर करता येणार नाही. आंदोलनादरम्यान अन्न शिजवणे, कचरा टाकणे यास सक्त मनाई असेल. आंदोलकांच्या वाहनांच्या हालचालींसाठीही ठोस मार्ग आखण्यात आले आहेत. आंदोलकांची वाहने मुंबईत ईस्टर्न फ्री वे मार्गे वाडीबंदरपर्यंत आणली जातील. त्यानंतर फक्त पाच वाहनांना आझाद मैदानात प्रवेश दिला जाईल, तर उर्वरित वाहने पोलिसांच्या निर्देशांनुसार शिवडी, ए-शेड आणि कॉटनग्रीन परिसरात पार्क करावी लागतील. याशिवाय लहान मुले, गर्भवती स्त्रिया आणि वृद्धांना आंदोलनात सहभागी न करण्याचा विशेष आदेश देण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीस कोणताही अडथळा येऊ नये याची दक्षता घेण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.



आंदोलन एका दिवसापुरते राहणार नाही: जरांगे पाटील 


या सर्व अटींवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, "लोकशाही व कायद्याचे सर्व नियम आम्ही पाळणार आहोत. माझा समाजदेखील ते पाळेल. आम्ही हट्टी नाही. पण हे आंदोलन केवळ एका दिवसापुरते राहणार नाही. आम्ही बेमुदत आंदोलन करणार. सरकारला जर वाटत असेल की एक दिवसाची परवानगी पुरेशी आहे, तर मग त्यांनी एका दिवसातच आरक्षण मंजूर करावे. अन्यथा आम्ही मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन करत राहू."


जरांगे पाटलांनी सरकार आणि न्यायालयाचे परवानगीबद्दल आभार मानले असले, तरी त्यांनी घेतलेला बेमुदत आंदोलनाचा निर्णय राज्यातील राजकीय घडामोडींना आणखी तापवणार आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर लोक मुंबईत येत असल्याने प्रशासनाने सर्वतोपरी काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.


मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी विविध टप्प्यांवर आंदोलनं झाली, अनेकदा कायदेशीर अडथळे आले. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही वर्षांत या प्रश्नाला नवी धार दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे. आता पुन्हा एकदा आझाद मैदानावर होणारे हे बेमुदत आंदोलन राज्य सरकारसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

Comments
Add Comment

दादरमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या हेतूने समाजकंटकांचं धक्कादायक कृत्य

मुंबई : मध्य मुंबईत दादर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या

मुंबईत मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईत मागील काही दिवसांपासून साथीच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ होत असून मलेरियाच्या

मुंबईत पावसाचे टार्गेट पूर्ण, आतापर्यंत तब्बल १०३ टक्के पावसाची नोंद

मुंबई (खास प्रतिनिधी) : यंदा पावसाने वेळेआधीच हजेरी लावल्यानंतर ज्या प्रकारे बरसात करत आहे, ते पाहता आता मुंबईतील

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.