अनेकदा आपल्या आजूबाजूलासुद्धा आपण असे लोक बघतो जे कायम स्वतःच खरं करतात. अगदी कोणीही कितीही अनुभवी व्यक्तीने सल्ला दिला, मार्गदर्शन केले तरी काही व्यक्ती ते समजून उमजून घेण्याच्या मानसिकतेतच नसतात. अशा लोकांना स्वतःला स्वतःच्या चुकांचा, अविचारी निर्णयांचा खूप त्रास होतो पण विनाशकाले विपरीत बुद्धी या उक्तीनुसार नुकसान होत असलं तरी ते अजिबात स्वतःमध्ये बदल करत नाहीत. एकदा आजूबाजूच्या सगळ्यांना असे भावनिक, मानसिक ब्लॅकमेल करून आपला कोणताही अट्टाहास पचू शकतो हे सिद्ध झाल्यावर ही व्यक्ती खूप आत्मविश्वासाने स्वतःच्या चुकांचे प्रमाण वाढवत नेते. अशा व्यक्तींच्या चुकांमुळे, चुकीच्या व्यवहारामुळे, वागण्यामुळे त्याचे स्वतःचे शारीरिक मानसिक स्वास्थ्य हरवतेच पण असे लोकं यासाठी मी जबाबदार आहे असं मान्य न करता वेळोवेळी कोणाचेही नाव पुढे करून त्याच्यावर आपल्या अपयशाच खापर फोडतात. हेकेखोरपणा अशा स्वभावामागील मानसिकतेचे सविस्तर कारण आणि त्यांच्या स्वभावामागे असलेल्या घटना या लेखामार्फत आपण जाणून घेणार आहोत.
मी म्हणतो तेच खरं अशा व्यक्तींच्या स्वभावात अनेक गुंतागुंतीची मानसशास्त्रीय कारणे दडलेली असू शकतात. बाह्यतः ही व्यक्ती हट्टी, दुर्लक्ष करणारी किंवा अहंकारी वाटू शकते. अशा व्यक्तीमध्ये काही ठरावीक मानसिक वैशिष्ट्ये दिसून येतात ते म्हणजे असुरक्षितता आणि भीती हा एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. अशा लोकांच्या मनात एक प्रकारची खोलवर रुजलेली असुरक्षितता असते. त्यामुळे, कोणत्याही कोणाच्याही सल्ल्याला किंवा मार्गदर्शनाला ते स्वतःवरचा हल्ला मानतात आणि त्याला विरोध करतात. त्यांच्या मते, दुसऱ्याचे मार्गदर्शन स्वीकारणे म्हणजे स्वतःची कमी कबूल करण्यासारखं आहे. दुसरे म्हणजेच नियंत्रण गमावण्याची भीती यांच्यामध्ये असते. दुसऱ्यांनी दिलेला सल्ला स्वीकारणे म्हणजे आपल्या आयुष्याचा ताबा दुसऱ्यांच्या हातात देण्यासारखं त्यांना वाटतं. ही नियंत्रण गमावण्याची भीती इतकी जास्त असते की, चुकीच्या मार्गावर असूनही ते स्वतःच्याच निर्णयावर ठाम राहतात. 'सत्य' आणि 'मी' यांची एकरूपता हा एक पैलू अशा लोकांमध्ये आढळतो. अशा व्यक्तीसाठी 'सत्य' हे त्यांच्या स्वतःच्या विचारांशी आणि कृतींशी जोडलेलं असतं. त्यांच्या मते, 'मी जे करतोय तेच बरोबर आहे' आणि 'मी जो आहे तोच बरोबर आहे'. त्यामुळे, त्यांच्या विचारांना किंवा कृतींना आव्हान देणे म्हणजे त्यांच्या अस्तित्वालाच आव्हान देणे होय. जर कोणी त्यांच्या मताला, विचारांना, निर्णयाला आडवं गेलं, विरोध केला, त्यांना जे आवडत नाही, पटत नाही ते केल तर हे लोक त्यांच्याशी संपर्क तोडतात. त्यांच्या मनाविरुद्ध वागणारी जितकी लोक असतील त्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी हे पूर्ण प्रयत्न करतात. आपल्या भूमिकेच्या आड येणारे आपले शत्रू आहेत, विरोधक आहेत अशी त्यांची मानसिकता असते आणि त्यामुळे आपल्या विरोधात अनेक लोकांचे एकमत होऊ नये आणि आपल्यावर सामूहिक हल्ला आपल्या वागणुकीविरोधात होऊ नये यासाठी ते पूर्ण प्रयत्न करतात. आपल्या इच्छेविरुद्ध वागणाऱ्या प्रत्येकाला ते आपला शत्रू मानत असल्यामुळे त्याची इतरांमध्ये बदनामी करणे, त्याच्या बद्दल अफवा पसरवणे, गटबाजी करणे, एखाद्याला एकटे पाडणे, त्याला टार्गेट करणे यातून हे लोकं स्वतःच्या चुकांना झाकण्याचा प्रयत्न करतात.चुका स्वीकारण्याची अक्षमता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या लोकांना कोणत्याही थराला नेण्यासाठी कारणीभूत असतो. आपल्या चुका मान्य करणे हे एक प्रकारचं मानसिक धैर्य आहे. पण, अशा व्यक्तीमध्ये हे धैर्य नसतं. त्यांना असं वाटतं की चूक स्वीकारणे म्हणजे पराभव स्वीकारणे. स्वतःला आणि इतरांना त्रास झाला तरी, ते या गोष्टी गांभीर्याने घेत नाहीत कारण त्यांना हे मान्य करायचं नसतं की त्यांची कृती, त्यांचा निर्णय चुकीचा होता. ते अनेक गंभीर गोष्टी उडवून लावतात, जेणेकरून त्यांना आपल्या चुकीचा सामना करावा लागणार नाही. आपल्या चुकीकडे कोणाचे लक्ष जाण्याअगोदर ते या चुकीचं खापर फोडण्यासाठी एखादा बळीचा बकरा शोधून ठेवतात. त्यांच्या नियंत्रणाबाहेर कोणतीही गोष्ट जाते आहे अस लक्षात आल्यास हे लोक ताबडतोब एखादी मन घडत कहाणी रचून इतरांच्या गळी उतरवतात आणि स्वतःची बाजू सुरक्षित करतात.
अशा प्रकारच्या मानसिकतेची पाळे मुळे त्या व्यक्तीच्या बालपणात किंवा तिच्या मागील अनुभवांमध्ये दडलेली असू शकतात त्यावर नजर टाकणे गरजेचे आहे. बालपणीचे आघात यामागील जटील कारण आहे. काही व्यक्तींना बालपणी खूप टीका किंवा अपमान सहन करावा लागला असेल तर असे होऊ शकते. त्यांच्यावर वारंवार टीका झाल्यामुळे त्यांच्या मनात 'मी कधीच पुरेसा नाही' अशी भावना निर्माण होते. या भावनेपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी ते एक बचावात्मक कवच तयार करतात, ज्यामुळे ते कोणाचंही ऐकत नाही. आपलंच खरं करून स्वतःला कायम बरोबर आणि खरं सिद्ध करणे त्यांच्यासाठी रोजची लढाई असते. कमी 'आत्मसन्मान' असणे. कमी आत्मसन्मान असणाऱ्या व्यक्तींना असं वाटतं की ते चुकीचे आहेत किंवा कमी आहेत. या असुरक्षिततेतून बाहेर पडण्यासाठी ते स्वतःलाच श्रेष्ठ मानू लागतात. दुसऱ्यांचा सल्ला नाकारून ते तात्पुरती श्रेष्ठत्वाची भावना अनुभवतात. ही एक प्रकारची मानसिक भरपाई असते. कोणाचं काही ऐकून घेणे त्यांना कमीपणा वाटतो. 'नार्सिसिस्टीक व्यक्तिमत्त्वविकार'देखील अशी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी कारणीभूत असतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये, हे वर्तन 'नार्सिसिस्टीक व्यक्तिमत्त्व विकारा'शी संबंधित असू शकतं. या विकारात, व्यक्तीला स्वतःबद्दल खूप जास्त महत्त्व वाटतं. त्यांना असं वाटतं की ते अद्वितीय आहेत आणि इतरांपेक्षा श्रेष्ठ आहेत. आपल्या आजूबाजूचे सगळे मूर्ख आहेत त्यांना काहीही सांगून दिशाभूल करणे सोपे आहे. या वृत्तीमुळे त्यांना कोणाच्याही सल्ल्याची गरज वाटत नाही. दुसऱ्यांच्या भावना किंवा त्रासाची त्यांना पर्वा नसते, कारण त्यांच्यासाठी फक्त स्वतःचे विचार, हट्ट आणि गरजा महत्त्वाच्या असतात. आपल्या नियमानुसार जग चालले पाहिजे ही त्यांची हटवादी वृत्ती असते. जो आपलं अंधानुकरण करत नाही, जे लोक एकमेकांना विश्वासात घेवून आपल्या कोणत्याही गोष्टीला विरोध करतात त्यांना वाटते त्या लोकांना फोडण्यासाठी, तोडण्यासाठी, वेगळे करण्यासाठी असे लोक वेगवेगळ्या पद्धतीने, प्रकाराने प्रयत्न करतात.
'संरक्षण यंत्रणा' अशा व्यक्ती वारंवार काही विशिष्ट संरक्षण यंत्रणांचा वापर करतात. जसे की 'नकार'. ते समस्या अस्तित्वातच नाहीये असं मानतात, जेणेकरून त्यांना त्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. तुम्ही ज्या गोष्टीला समस्या किंवा त्रास म्हणत आहात तो माझ्या लेखी त्रास नाहीच आहे कोणतीही समस्या नाहीच आहे असं ते इतरांना पटवून देतात. कोणतीही चुकीची घटना घडल्यावर पण हे असे झालेच नव्हतेच हे माझ्यामुळे नाही झाले याला कारणीभूत भलतीच व्यक्ती होती. या पद्धतीने पटवून देण्यात हे लोक माहीर असतात. जे कोणी अशा लोकांना काही गंभीर चुकांचे, घटनांचे भविष्यात होणारे गंभीर परिणाम लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतो त्याला हे लोक वेसण घालण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांकडून अनेकदा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना खूप मर्यादा घातल्या जातात, बंधनात ठेवले जाते, इतरांवर लक्ष आणि नजर ठेवली जाते. इतरांचे वागणे, बोलणे कंट्रोल करून इतरांमध्ये फूट पाडून ही व्यक्ती स्वतःला सुरक्षित समजते. प्रत्येकजण माझ्याच बाबतीत माझ्या मागे काहीतरी बोलेल, माझ्याबद्दलच चर्चा होईल, माझ्या विरुद्ध काही नियोजन अथवा कट केला जाईल ही भीती अशा लोकांना कायम वाटतं असते. मी जे करत नाही, मला जे आवडत नाही ते तुम्हीही करू नका, मला जे पटत नाही ते कोणीच करायचं नाही अशी त्यांची अपेक्षा असते. मला जे अपेक्षित नाही त्याबद्दल कोणी आपापसात बोलायच पण नाही यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. अशा व्यक्तीचा स्वभाव केवळ 'हट्टीपणा' नसून त्यामागे खोलवर रुजलेली असुरक्षितता, भीती आणि मानसिक आघातांशी संबंधित जटिल भावना असू शकतात. हे वर्तन त्यांचे आंतरिक जग सुरक्षित ठेवण्याचा एक मार्ग असतो, भलेही त्यामुळे त्यांना आणि इतरांना त्रास होत असला तरी.
अशा व्यक्तीला मदत करण्यासाठी, तिच्या वर्तनाला केवळ 'चुकीचे' ठरवण्याऐवजी, त्यामागची खरी कारणे समजून घेणे महत्त्वाचे असते. अशा व्यक्ती, अशा मानसिकतेमधून जाणारी कुटुंब यांच्यासाठी समुपदेशन, एकमेकांशी मोकळा संवाद साधने, सतत बोलत राहणे, परस्परांना समजावून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या बाबतीत असे कोणी करत असेल अथवा घडतं असेल तर वेळीच जागे होणे, कोणाच्याही खोट्या रचलेल्या मिथ्या ना बळी न पडणे, अशा लोकांच्या सांगण्यावरून आपल्या संपर्कातील चांगली जवळची माणस न गमावणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- मीनाक्षी जगदाळे