Wednesday, August 27, 2025

Pune Metro: गणेश भक्तांसाठी स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दर तीन मिनिटांला धावणार मेट्रो

Pune Metro: गणेश भक्तांसाठी स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दर तीन मिनिटांला धावणार मेट्रो

पुणे: गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी पुणे शहराच्या मध्य भागांत भाविकांची मोठी गर्दी होते. यामुळे भाविकांना ये-जा करण्यासाठी, तसेच गर्दीवर नियंत्रणासाठी महामेट्रोने गणेशोत्सवात स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट यादरम्यान दर तीन मिनिटांला मेट्रो सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी दोन दिवसांपासून चाचणी घेतली जात आहे. यामुळे मंडई, कसबा पेठ येथील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली. पुण्यातील गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे. यामुळे देखावे पाहण्यासाठी राज्य, राज्याबाहेरील तसेच परदेशातील गणेशभक्त पुण्यात येतात. यंदा मध्य शहरातील कसबा आणि मंडई हे दोन मेट्रोस्थानक सुरू झाल्यामुळे भाविकांना मुख्य देखावे पाहण्यासाठी सोयीचे होणार आहे. गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत सेवा देण्याचे नियोजन केले आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मार्गावर मेट्रो सुरू असणार आहे.

या मार्गावरील कसबा, मंडई, स्वारगेट ही मेट्रो स्थानके सुरू झाली आहे. ही स्थानके नागरिकांना थेट मानाच्या गणपतीच्या जवळपास आहे. शिवाय, मध्यवर्ती भागात गर्दी जास्त होते. त्यामुळे मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. तसेच, मध्य वस्तीमधील मंडई, कसबा येथे गर्दी होऊ नये म्हणून नियोजन करण्यात आले आहे. मंडई येथे एका बाजूला प्रवेश आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्याची सोय करण्याचे नियोजन आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा