
पुणे: ढोल-ताशा पथकांचा निनाद, बँडपथकांनी आळवलेल्या मधूर सुरावटी आणि ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजन करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. ढगाळ वातावरण असूनही ऊन आणि पावसाने विश्रांती घेतल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आनंदाचे उधाण आले होते. सर्वत्र आनंद आणि मांगल्याची उधळण करणाऱ्या विघ्नहर्त्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि गणरायाला तोरण अर्पण करण्यासाठी गणेशभक्तांची रांग लागली होती.
मानाच्या गणपतींची मुहूर्तावर प्रतिष्ठापना करण्यात आली. विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वाजतगाजत गणरायाचे स्वागत केले. प्रतिष्ठापनेचा मुहूर्त दुपारी १ वाजून ५३ मिनिटाांपर्यंत असला तरी त्यानंतरही मिरवणूक काढून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. शहर आणि उपनगरांमध्येही गणरायाच्या आगमन मिरवणुका रात्रीपर्यंत सुरू होत्या.
कसबा गणपती
उत्सव मंडपातून सुरू झालेल्या पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक पारंपरिक चांदीच्या पालखीतून सुरू झाली. संघर्ष, अभेद्य आणि श्रीराम ढोल-ताशा पथकांचा सहभाग असलेली मिरवणूक अभिजित धोंडफळे यांच्याकडून उत्सव मूर्ती घेतल्यानंतर रास्ता पेठ, रवींद्र नाईक चौक, दारुवाला पूल आणि फडके हौदमार्गे उत्सव मंडपामध्ये आली. स्वामी सवितानंद यांच्या सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
तांबडी जोगेश्वरी
केळकर रस्त्यावरील मूर्तिकार गुळुंजकर यांच्याकडून उत्सव मूर्ती घेतल्यानंतर ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणूक सुरू झाली. आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ग्रास बॅण्ड, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, ताल पथक, विष्णुनाद शंख पथक यांचा सहभाग असलेली ही मिरवणूक कुंटे चौक, नगरकर तालीम चौक, आप्पा बळवंत चौकमार्गे उत्सव मंडपात पोहोचली. सनई-चौघड्याच्या निनादामध्ये चांदीच्या पालखीत वासुदेव आश्रम निवासाचे प्रधान विश्वस्त शरद जोशी यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून ११ मिनिटांनी गणरायाची प्रतिष्ठापना झाली.
गुरुजी तालीम
स्वप्नील सरपाले आणि सुभाष सरपाले यांनी साकारलेल्या पुष्परथातून गुरुजी तालीम मंडळ या मानाच्या तिसऱ्या गणपतीची मिरवणूक सकाळी ११ वाजता गणेश मंदिरापासून सुरू झाली. जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँड, गुरुजी प्रतिष्ठान ढोल-ताशा पथक, राघमंत्र ढोल ताशा पथक, विघ्नहर्ता ढोल ताशा पथकांचा सहभाग असलेली ही मिरवणूक गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, आप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौकमार्गे उत्सव मंडपात आली. युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.तुळशीबाग मंडळ
फुलांचा वर्षाव करीत ढोल-ताशांच्या गजरात मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीची पारंपारिक पद्धतीने पालखीतून ही मिरवणूक काढण्यात आली. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष (१२५ वे) साजरे करत असलेल्या मंडळाच्या गणरायाची प्रतिष्ठापना आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्या हस्ते दुपारी सव्वाबारा वाजता करण्यात आली. गणरायाच्या आगमन सोहळ्याचा शुभारंभ उद्योजक पुनीत बालन व उत्सवाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते झाला. मिरवणुकीत लोणकर बंधूचे नगारावादन रुद्रांग व तालगर्जना वाद्यपथक सहभागी झाले होते.
केसरीवाडा गणेशोत्सव
केसरीवाडा गणेशोत्सवाची मिरवणूक रमणबाग चौकातून सकाळी नऊ वाजता सुरू झाली. बिडवे बंधू यांचे सनई-चौघडा वादन अग्रभागी असलेल्या मिरवणुकीमध्ये परंपरेनुसार मानाच्या पालखीत गणराय विराजमान होते. रौनक रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर श्रीराम आणि शिवमुद्रा या ढोल-ताशा पथकांचे केसरीवाड्यात स्थिर वादन झाले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट
प्रेरणादायी आध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहंब रंगारी ट्रस्टच्या गणरायाची दुपारी सव्वाबारा वाजता प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यापूर्वी सकाळी साडेआठ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. लाठीकाठी मर्दानी खेळ, केशव पथकाचा शंखनाद, श्रीराम पथक, कलावंत, वाद्यवृंद, विश्वगर्जना, स्वयंभूगर्जना, गजर आणि नूमवि ही सात ढोल-ताशा पथके मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती. रथाला बैलजोडी न लावता ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे आणि उत्सवर्पमुख पुनीत बालन यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा रथ ओढला.
अखिल मंडई मंडळ
फुलांनी सजलेल्या भव्य मयूर रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची मिरवणूक सकाळी दहा वाजता सुरू झाली. युनिटी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड अध्यक्ष नवीनचंद्र मेनकर आणि स्नेहल मेनकर यांच्या हस्ते शारदा गजाननाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यापूर्वी समाज मंदिरापासून सुरू झालेली मिरवणूक मंडई पोलीस चौकी, हुतात्मा बाबू गेनू चौक, रामेश्वर चौक, गोटीराम भैया चौक येथून उत्सव मंडपात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बॅन्ड पथक तसेच मल्हार ढोल ताशा पथक सांगवी, स्वराज्य पथक काळभोर नगर चिंचवड, समर्थ पथक होते.