
गुरुदासपूर: पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हिमाचल व जम्मू-काश्मीरमधून आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेक भागांत पूरस्थिती गंभीर झाली आहे. या पुराचा मोठा फटका गुरुदासपूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाला बसला असून, शाळेचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे. यामुळे सुमारे ४०० विद्यार्थी आणि ४० कर्मचारी तिथे अडकले आहेत.
ही शाळा गुरुदासपूरपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या डाबुरी गावात आहे. तळमजल्यावरील वर्गखोल्या पूर्णपणे पाण्याने भरल्या असून, रस्ते खराब झाल्याने मदतकार्य पोहोचण्यास अडचणी येत आहेत. सध्या जिल्ह्याचे अधिकारी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने बचावकार्य सुरू होण्यास विलंब होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप जवाहर नवोदय विद्यालय ही केंद्र सरकारची निवासी शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले नव्हते. मात्र, पुराची शक्यता तीन दिवसांपासून माहीत असतानाही मुलांना सुरक्षित का हलवले नाही, असा संतप्त सवाल पालकांनी विचारला आहे. प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील शाळांना तीन दिवसांची सुट्टी दिली असताना, या निवासी शाळेतील मुलांना घरी का पाठवले नाही, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
१९८८ च्या महापुरातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु सध्याची परिस्थिती त्यावेळेपेक्षा अधिक गंभीर असल्याचा दावा केला जात आहे. शाळेजवळचा नाला गेल्या अनेक महिन्यांपासून साफ न केल्यामुळे पाणी थेट वस्तीमध्ये शिरल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.