Wednesday, August 27, 2025

मुंबईतील 'हे' १२ पूल गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी धोकादायक! BMC चा निर्वाणीचा इशारा

मुंबईतील 'हे' १२ पूल गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी धोकादायक! BMC चा निर्वाणीचा इशारा

१२ पुलांवरून श्रीगणेश मिरवणूक नेताना काळजी घेण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १२ पूल धोकादायक स्वरुपाचे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यांपैकी काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तर काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशभक्तांनी श्रीगणेशाचे आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन  बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस यांच्या वतीने देण्यात आले आहे.

मुंबईतील धोकादायक पूलांची नावं 

मध्य रेल्वेवरील घाटकोपर रेल्वे उड्डाणपूल, करी रोड रेल्वे उड्डाणपूल, आर्थर रोड रेल्वे उड्डाणपूल किंवा चिंचपोकळी रेल्वे उड्डाणपूल, भायखळा रेल्वे उड्डाणपुल, मरीन लाईन्स रेल्वे उड्डाणपूल, सँडहर्स्ट रोड रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फ्रेंच रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), केनडी रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फॉकलॅन्ड रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये), महालक्ष्मी स्टेशन रेल्वे उड्डाणपूल, प्रभादेवी–कॅरोल रेल्वे उड्डाणपूल आणि दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे उड्डाणपूल असे एकूण १२ पूल धोकादायक अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले आहे, त्यामुळे या वरील पूलांवरून गणपतीची मिरवणूक नेताना काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

एकवेळेस अधिक वजन घेण्यासाठी क्षमता नाही

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान भाविक रस्त्यावर बऱ्याच वेळ थांबून नाचगाणी करतात, खास करून मोठ्या गणेश मंडळाकडून हे दरवर्षी केले जाते. बऱ्याचदा पूलांवर देखील थांबून गणपतीची मिरवणूक काढली जाते. मात्र मुंबईतील १२ धोकादायक पुलांवर यंदा मिरवणुकीदरम्यान जास्त वेळ थांबणे चुकीचे ठरेल. कारण,  एकावेळेस अधिक वजन या पूलांना पेलावणार नाही, अशी शंका पालिकेने व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित पूलांवरून मिरवणूक काढताना काही नियम आणि अटी प्रशासनाने लागू केल्या आहेत.

धोकादायक पूलांचा वापर करताना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबईत धोकादायक अवस्थेत असलेल्या १२ पूलांवरून जातानया ध्वनिक्षेपकाचा वापर करुन नाचगाणी करण्यात येऊ नये. उत्सवाचा आनंद पुलावरुन खाली उतरल्यावर घ्यावा. पुलावर एका वेळेस भाविकांनी जास्त गर्दी न करता, पुलावर जास्त वेळ न थांबता त्वरित पुलावरुन पुढे जावे असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पोलीस व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार मार्गक्रमण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >