भाजपने केला विजयाचा फार्म्युला सेट

  15

पुणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, महापालिकेच्या निवडणुका या दिवाळीनंतर होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उत्सुकता असलेली निवडणुका प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली असून, सत्ताधारी भाजपला अनुकूल असल्याचे चित्र आहे. यामुळे भाजपने आपल्या विजयाचा फॉर्म्युला सेट केला आहे.


नव्या प्रभागरचनेनुसार महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या आता १६५ झाली आहे. तसेच ४१ प्रभाग असणार आहेत. ४१ प्रभागांपैकी ३८ हा पाच सदस्यीयांचा असणार आहे. तर ४० प्रभाग ही चार सदस्यीय असणार आहेत. ३ सप्टेंबरपर्यंत यावर कार्यालयीन वेळेत हरकती सूचना नोंदवण्यास वेळ देण्यात आली आहे. प्रभागरचना आणि २७ टक्के ओबीसी आरक्षण या दोन मुद्यांवर महापालिकेची निवडणूक तीन वर्षे रखडली गेली. तीन वर्षे प्रशासक नेमला गेला. या प्रभागरचनेत काही ठिकाणी शिवसेनेला भाजपची साथ मिळाली असल्याचे दिसून येत असले, तरी महायुतीत असून, राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र कोंडी केली असल्याचे अनेक प्रभागांच्या रचनेवरून स्पष्ट होत आहे. तर, काही प्रमुख महाविकास आघाडीतील विरोधकांना थेट कात्रजचा घाट दाखविण्यात आल्याचेही चित्र या रचनेतून दिसून येत आहे.


निवडणुकीची घोषणा होताच भाजप पदाधिकाऱ्यांनी २०१७ ची प्रभागरचना कायम ठेवावी आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गावांसाठी स्वतंत्र प्रभाग करावेत, अशी भूमिका घेतली होती. कारण चार प्रभाग पद्धतीमुळे २०१७ मध्ये भाजपचे १०० नगरसेवक निवडून आले होते. प्रत्यक्षात समाविष्ट गावांसाठी स्वतंत्र प्रभागरचना न करता १९९७-९८ मध्ये समाविष्ट झालेल्या जुन्या २३ गावांच्या प्रभागांनाच ही गावे जोडली आहेत. त्यामुळे त्याचा फटका थेट उपनगरांमध्ये आणि या गावांमध्ये वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादीला बसला आहे. अजित पवार यांच्या शिलेदारांचे प्रभाग वेड्यावाकड्या पद्धतीने तोडण्यात आल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो. महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ४२ नगरसेवक निवडून आले होते. मात्र पक्षात फूट पडल्याने सर्वाधिक नगरसेवक अजित पवारांकडे आहे. मात्र भाजपने प्रभागरचना करताना राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेले प्रभाग मोठे करून ठेवल्याने राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी झाली आहे. प्रभाग मोठे करताना राष्ट्रवादीचे इच्छुक समोरासमोर येतील याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांची कोंडी झाली आहे.


२०१७ चीच प्रभागरचना कायम ठेऊन समाविष्ट गावांची संख्या आणि उपनगरांची संख्या कमी झाली आहे. तिथे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्राबल्य होते. प्रामुख्याने भाजपला अनुकूल असलेल्या कसबा पेठ, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर तसेच पुणे कॅन्टोन्मेट या मतदारसंघांतील प्रभागांची रचना करताना लोकसंख्येच्यादृष्टीने छोटे प्रभाग करण्यात आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघांत प्रभागांची संख्या वाढवून जास्तीतजास्त नगरसेवक निवडून आणण्याचे नियोजन करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच, २०१७ ला ज्या प्रभागांत भाजपचेच चार सदस्य निवडून आले होते, त्याच प्रभागांची रचना पुन्हा किरकोळ बदल वगळता पुन्हा तशीच कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे अनेक माजी नगरसेवक सुरक्षित झाल्याचे चित्र आहे. पेठामध्ये छोटे प्रभाग केले आहेत, तर उपनगरामध्ये मोठे प्रभाग केलेत. उपनगरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना आमनेसामने येतील असेच या प्रभागरचनेतून स्पष्ट होत आहे. अशीच स्थिती शहराच्या दक्षिण भागात असून तिथे शिवसेना आणि मनसेचे उमेदवार आहेत. हा भाग क्षेत्रफळानुसार मोठा ठेवण्यात आला असून राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे आमनेसामने लढतील याची काळजी घेण्यात आली आहे. उपनगरामध्ये प्रभाग मोठे ठेवल्याने प्रचार करतानाही तारांबळ उडणार आहे हे मात्र नक्की.


वेडीवाकडी प्रभागरचना आल्याने इच्छुकांची पण पळापळ होणार आहे. प्रभागरचना पुणे महापालिकेने रचना नगर विभागाला पाठवली होती. त्यात तीन सदस्यांचा प्रभाग असावा असा प्रस्तावही होता. पण तो तीन सदस्य न ठेवता पाच सदस्यांचा एकच प्रभाग करण्यात आला आहे. यामुळे आता फडणवीस आणि शिंदे यांच्यात शीतयुद्ध पेटणार असल्याचे बोलले जात आहे. प्रभागरचना झाल्याने तीन वर्षे रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नव्याने केलेल्या प्रभागरचनेत अनेक प्रभागाचे नकाशे बदलले आहेत. त्यामुळे काहींना आनंद झाला आहे, तर काही पक्षात नाराजी व्यक्त केली आहे. परिणामी शहरातील राजकीय वातावरणात ‘कही खुशी कही गम' अशीच स्थिती निर्माण झाली आहे. या प्रभागरचनेमुळे महायुतीतील घटक पक्षांमध्येही नाराजी निर्माण झाली असल्याने महायुतीमध्ये शीतयुद्ध पेटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. प्रभागरचना जाहीर झाल्याने निवडणुकीची नांदी तर झाली आहे. तिसरी घंटा वाजली आहे. आता मतदार राजाने जागृत राहिले पाहिजे.

Comments
Add Comment

महापुराचे संकट तूर्तास टळले, नुकसान अटळ!

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्हे कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नद्यांच्या खोऱ्यात वसलेले

येवा कोकण तुमचाच आसा...!

वार्तापत्र : कोकण कोकणामध्ये गणेशोत्सव, शिमगोत्सव हे सण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उत्साहाने

सूर्यावर वादळवारे होतात का?

कथा : प्रा. देवबा पाटील सूर्यावर हायड्रोजन व हेलियममध्ये सतत रासायनिक प्रक्रिया होत असल्यामुळे त्या

विविध कारणांनी चर्चेचा ठरला अजित पवारांचा दौरा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी नुकताच विदर्भातील नागपूर आणि

ढगफुटीनंतर अश्रूंचा बांध फुटला...

निसर्गापुढे कोणाचेच काही चालत नाही, याचा प्रत्यय मराठवाड्यात पुन्हा एकदा आला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड

‘क्लॅट’ कशी क्रॅक कराल?

करिअर : सुरेश वांदिले कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (क्लॅट) परीक्षेसाठी सर्वसाधारण स्वरूपाचा अभ्यासक्रम असला तरी तो लवचिक