
महाराष्ट्रात आणि देशातही घराघरांत पोहोचलेला आणि आबालवृद्धांचा आराध्य दैवत गणेशोत्सवाची सुरुवात आजपासून देशात सर्वत्र होत आहे. हा एकमेव सण असा आहे, की ज्याला जातपात, स्त्री-पुरुष, किंवा वर्णजात असे कसलेही भेदाभेद नाहीत. त्यादृष्टीने भेदाभेद अमंगल याहून पलीकडे हा सण साजरा केला जातो. भारतात निवडणुका आणि गणेशोत्सव हेच दोन उत्सव असे आहेत, की जे अनेक दिवस चालतात. त्यातही गणेशोत्सव हा असा सण आहे, की जो सांस्कृतिक एकतेचा आणि धार्मिक सलोख्याचे प्रतीक आहे. सर्वधर्म समभावाचा संदेश देणारा असा हा एकमेव सण असावा. कारण इतर सणांच्या बाबतीत धर्माचे विभाजन केले अाहे. पण गणशोत्सवाच्या बाबतीत ते लागू होत नाही. गणेशोत्सव हा त्यादृष्टीने सर्व सणांचा राजा आहे आणि तो दहा दिवस चालतो. त्या दिवसांत संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आणि सणांचे, जल्लोषांचे वातावरण असते. इतकेच नव्हे तर स्थळ, काळ, प्रांत आणि समाजाच्या सर्व सीमा लांघून गेेलेला हा सण. श्री गणेश देवता हे सर्वांचे आराध्य दैवत. पण गणेशोत्सव हा असा सण आहे, की जो आर्थिकदृष्ट्या भारताचे कल्याण करणारा आहे. कारण या काळात सर्व वस्तूंची उलाढाल लाखो-कोटी-अब्जांच्या घरात जाते आणि देशाचे आर्थिक कल्याण पराकोटीला पोहोचलेले असते. संपूर्ण जगभरात साजरा केला जाणारा हा उत्सव अनेक लोक, समूह उपस्थित राहून आणि त्यात भाग घेऊन या सोहळ्याला चार चांद लावतात. असा हा एकमेव सण असावा असेही वाटते. गणेशोत्सव परंपरा कोणी सुरू केली हा वाद बाजूला ठेवू या.
गणेशोत्सव हा सण देशकालाच्या सीमा भेदून गेला आहे. कारण तो आशिया खंडच नव्हे तर कित्येक देशात साजरा केला जातो. त्या दृष्टीनेही त्याला अपार महत्त्व आहे कारण सर्वत्र साजरा केला जाणारा हा सण आहे. गणेशत्सवाची व्याप्ती, संस्कृती आणि प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वचनबद्ध असल्याचे जाहीर केले आहे. पण कितीतरी वर्षांहून अधिक काळापासून हा उत्सव सर्वोतोपरी आहे. गणेशाचे भक्त गरीब असोत, की श्रीमंत कुणी कितीही फाटका असला तरीही आपल्या झोपडीतही गणेशोत्सव साजरा करतोच. 'गणेश बाप्पा' हा असा देव आहे, की ज्याला कसलेही अवडंबर लागत नाही. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून दहा दिवस सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते आणि भाविकांच्या उत्साहाला धरबंद नसतो. त्यामुळे हा उत्सव समाज प्रिय आहे आणि समाजाने त्याला स्वीकारले आहे. गणेशोत्सवाचे आर्थिक महत्त्व तर अफाट आहे कारण महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांत प्रचंड उलाढाल फक्त दहा दिवसांच्या आत होते. गणपतीच्या मूर्ती. सजावटीचे साहित्य, प्रसाद आणि इतर साहित्यांची विक्री यात कित्येक लाखांची उलाढाल होते आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायाला उत्सव चालना देतो. त्यादृष्टीने गणेशोत्सव म्हणजे आर्थिक गणित रूळावर आणणारा आहे. ठिकठिकाणची आकडेवारी पाहिली असता या काळात देशभरात एकूण २० हजार ते २५ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे सर्वांना बाप्पा पावणारा आहे. आपला समाज उत्सव प्रिय आहे. एडम स्मिथ यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या देशात संपत्तीचे वितरण असमान असल्याने श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत आणि गरीब अधिकाधिक गरीब होत गेले. पण गणेशोत्सव हा त्याला अपवाद आहे आणि तो सर्वांना एक समान पातळीवर आणतो.
सामाजिक सलोखा जपणारा हा सण असल्याने त्याला आगळे महत्त्व आहेच. कारण या काळात हिंदू आणि मुस्लीम आणि ख्रिश्चन असे भेद नष्ट होतात. प्रत्येकजण उत्सवात मनापासून सहभागी झालेला असतो. गणेशोत्सव हा प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक समाजाला प्रिय आहे. त्याची ही सार्वकालीन अवस्थाच त्याला इतर सणांपेक्षा उंचीवर नेऊन ठेवते. सामाजिक एकता आणि आनंदाचा सोहळा असल्याने तो सर्वांना सारखाच प्रिय आहे. हे त्याचे एक वैशिष्ट्य मानावे लागेल. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी गणेशाची पूजा करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे या देवतेला आपोआपच अग्रपूजेचा मान जातो. अशा या देवतेची पुजा कुणाला मान्य होणार नाही हा प्रश्न आहे. देशातील आर्थिक असमानता काही काळापूरते तरी मिटवणारा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा हा सण सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य. कारण कोणतेही सण दहा दिवस साजरे केले जात नाही. आता हा सण साजरा करण्याच्या पद्धतीत काही अपप्रवृत्ती शिरल्यात आणि ते अपरिहार्य आहे. त्याविरोधात जागरूक नागरिकांनी ओरडही सुरू केली. डीजेचा दणदणाटात चालवणारे उत्सव, मद्य प्राशन करून मिरवणुकांमध्ये घातला जाणारा धिंगाणा या बाबी गालबोट लावणाऱ्या आहे. पण त्याविरोधात सुजाण आणि सजग नागरिकांनी आवाज उठवण्याची गरज आहे. 'आवाज' फाऊंडेशन ही संस्था उत्सव काळात मुंबईतील आवाजाचे प्रदूषण आणि त्यामुळे वृद्ध व्यक्तींवर होणाऱ्या परिणांमाचा अभ्यास करते. सुमैरा अब्दुल अली यांनी स्थापन केलेली ही संस्था अशा अनेक अपप्रवृत्तीचा बीमोड करते. त्याशिवाय यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तीवर बंदी नाही पण महाराष्ट्र सरकारने हे स्पष्ट केले आहे, की या मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी पर्यावरण निकषाचे पालन करावे लागेल. या अपप्रवृत्ती सोडल्या तर गणेशोत्सव हा धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा उत्सव व्हावा अशी गणेशचरणी प्रार्थना. या उत्सवात सारे भेद विसरून लोक एकत्र येतात ही त्याची आणखी एक सोनेरी बाजू आहे. पण आपण त्याकडे लक्ष न देता किरकोळ आणि दुर्लक्षणीय बाजूंकडेच लक्ष देतो हे आपले दुर्दैव. आपल्यातील वाईटावर चांगल्याची मात गणशोत्सवाच्या निमित्ताने करता येते आणि हाच संदेश हा गणेश बाप्पा आपल्याला देत असतो.